बालमृत्यू रोखण्यासाठी अतिसार पंधरवडा राबविणार; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती

बालमृत्यू रोखण्यासाठी अतिसार पंधरवडा राबविणार; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिसार नियंत्रण क्रार्यक्रम आढावा बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी

अर्भकमृत्यू व बाल मृत्युदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणापैकी एक असून 5 ते 7 टक्के बालके अतिसार मुळे दगावतात. ह्या विशेषत: पावसाळ्यात बालमृत्यूचे प्रमाण जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात 6 ते 21 जून 2024 या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिह्यातही अतिसार नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात अतिसार नियंत्रण कार्यक्रम आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. अतिसार पंधरवड्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे व अतिसार बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिह्यामध्ये जिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रामध्ये ओआरएस कॉर्नर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ओ.आर.एस.पाकीट., झिंकची गोळी वाटप करण्यात येतील. अतिसारचे लक्षणे आढळून आल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस., अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय रणविर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षदा वेदक, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद मोरे तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी हजर होते.