स्थायी समिती निवडणुकीबाबत कौन्सिल विभागाचे आयुक्तांना पत्र

निवडणुकीबाबत हालचाली गतिमान : लवकरच होणार निर्णय बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितींची निवडणूक घेण्याबाबत कौन्सिल विभागाने आयुक्तांकडे पत्र पाठविले आहे. त्याबाबत मनपा आयुक्तच काय ते निर्णय घेतील, असे कौन्सिल विभागातून सांगण्यात आले. प्रादेशिक आयुक्तांकडे मनपा आयुक्तांना हा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयानंतरच स्थायी समितींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. महानगरपालिकेमधील स्थायी समितींची मुदत […]

स्थायी समिती निवडणुकीबाबत कौन्सिल विभागाचे आयुक्तांना पत्र

निवडणुकीबाबत हालचाली गतिमान : लवकरच होणार निर्णय
बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितींची निवडणूक घेण्याबाबत कौन्सिल विभागाने आयुक्तांकडे पत्र पाठविले आहे. त्याबाबत मनपा आयुक्तच काय ते निर्णय घेतील, असे कौन्सिल विभागातून सांगण्यात आले. प्रादेशिक आयुक्तांकडे मनपा आयुक्तांना हा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयानंतरच स्थायी समितींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. महानगरपालिकेमधील स्थायी समितींची मुदत संपली आहे. त्यामुळे तातडीने त्यांची निवडणूक घेणे महत्त्वाचे आहे. आचारसंहिता असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. मात्र आता आचारसंहिता संपल्याने निवडणूक घ्यायला काहीच अडचण नसल्याचे सांगण्यात आले. कौन्सिल विभागातून मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांच्याकडे पत्र पाठविण्यात आले असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल.
महानगरपालिकेमध्ये चार स्थायी समितींची निवड केली जाते. यामध्ये शिक्षण-आरोग्य, अर्थ व कर, सार्वजनिक बांधकाम आणि लेखा स्थायी समितींचा समावेश आहे. या प्रत्येक समितीमध्ये सात जणांचा समावेश केला जातो. स्थायी समितीसाठी चेअरमनदेखील निवडला जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली या बैठका होत असतात.  आता या सर्व स्थायी समितींची मुदत संपल्याने निवडणूक घेणे बंधनकारक आहे. या स्थायी समितीमध्ये समावेश व्हावा यासाठी सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवक प्रयत्न करत आहेत. याचबरोबर विरोधी गटातील नगरसेवकही या समितींमध्ये वर्णी लागावी, यासाठी सत्ताधारी गटाबरोबर चर्चा करणार असल्याचे समजते. एकूणच आचारसंहिता संपल्याने स्थायी समितींच्या निवडीसंदर्भात हालचाली गतिमान झाल्या आहेत.