संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा

संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा

जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची आरोग्याधिकाऱ्यांना सूचना : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम
बेळगाव : मान्सूनला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी पाणी साचून संसर्गजन्य रोग उद्भवण्याची शक्यता आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया रोग फैलावण्याची शक्यता आहे. लार्वा अहवाल घेऊन डास उत्पन्न होणाऱ्या ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले. जिल्हा पंचायत सभागृहामध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या कामांचा अहवाल घेऊन ते बोलत होते. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्याधिकाऱ्यांनी मुलांची योग्यरितीने तपासणी करण्यात यावी. मुलांमध्ये प्रारंभिक टप्प्यात असलेल्या कमतरतेचा शोध घेऊन उपचार करण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. दृष्टीदोष असणाऱ्या मुलांना मोफत चष्मे देण्यात यावेत, यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून चष्मे देण्याची व्यवस्था करण्यात यावी. श्रवणदोष असणाऱ्या मुलांना श्रवणयंत्रे उपलब्ध करून देण्यात यावीत, आरोग्याधिकाऱ्यांनी आरोग्यासंदर्भातील कमतरता लक्षात घेऊन पालकांना माहिती देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील आणि अखत्यारित असणाऱ्या आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असणारे वाहनचालक आणि रुग्णवाहिका संदर्भातील माहिती जिल्हा पंचायतीला सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली. कंत्राटी तत्त्वावर भरून घेण्यात आलेल्या ग्रुप डी आणि संगणक साहाय्यक पदासाठी 33 टक्के महिला रोस्टर आधारावर भरती करून घेण्यात यावी. यापूर्वी भरती करून घेण्यात आलेल्यांना त्यांच्या कामाच्या आधारावर पुढे संधी देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रयोगशाळेत पाण्याच्या नमुन्यांची तपासणीनंतर त्यामध्ये त्रुटी आढळून आल्यास संबंधित ग्राम पंचायतीला माहिती देण्यात यावी. ग्राम पंचायतीकडून त्या ठिकाणी ते पाणी पिण्यास योग्य नसल्याचा फलक लावण्यात यावा, अशा सूचनाही केल्या. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात यावेत, अशा ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यात येत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी सूचना शिंदे यांनी केली. रक्तदान शिबीर भरविणाऱ्या रक्तपेढींकडून जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या रक्तपेढीला 25 टक्के रक्त देण्याचीही सूचना केली. यावेळी अप्पर जिल्हा आरोग्याधिकारी एस. एस. गडेद, जिल्हा कार्यक्रम अनुष्ठान अधिकारी, तालुका अधिकारी, मुख्य वैद्याधिकारी आदी उपस्थित होते.