अखेर सहावीची सदोष पाठ्यापुस्तके माघारी

अखेर सहावीची सदोष पाठ्यापुस्तके माघारी

तांत्रिक दोषामुळे व्याकरण चुका : नवीन छपाईनंतर पुस्तके वितरण
बेळगाव : सहावीच्या मराठीच्या पुस्तकात व्याकरणाच्या अक्षम्य चुका झाल्या आहेत. शब्दांना ऊकार, वेलांटी आणि काना-मात्रा नसल्यामुळे संपूर्ण पाठ्यापुस्तकात चुका आढळून येत आहेत. मागील दोन दिवसांत शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात सडकून टीका झाल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली. दोषपूर्ण पुस्तके शिक्षण विभागाकडून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पुढील काही दिवसांत विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके दिली जाणार आहेत. मराठी पाठ्यापुस्तक रचना समितीने दहा वर्षांपूर्वी सहावीच्या मराठी पुस्तकाची रचना केली होती. तेव्हापासून हे पाठ्यापुस्तक अभ्यासक्रमामध्ये अंमलात होते. 2024-25 या शैक्षणिक वर्षात पाठ्यापुस्तकाचे दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आले. विभाजन करतेवेळी भाषांतर करताना तांत्रिक दोष निर्माण झाल्याने  मजकुरामध्ये व्याकरणदृष्ट्या गंभीर चुका आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. पुस्तकांची हाताळणी केल्यानंतर त्यामधील अक्षम्य चुका शिक्षकांच्या नजरेस आल्या. पाठ्यापुस्तकात झालेल्या चुका बेळगावमधील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी, जिल्हाशिक्षणाधिकारी, तसेच डाएट प्राचार्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मागील आठवडाभरापासून या चुकांबाबत कोणता निर्णय घ्यावा, याबाबत चर्चा केली जात होती. शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पाठ्यापुस्तकातील चुकांबाबत अहवाल मागवला होता. केवळ बेळगावच नाही तर चिकोडी, बिदर, गुलबर्गा, विजापूर, कारवार येथेही मराठी शाळा आहेत. तेथूनही चुकांबाबत नाराजीचा सूर उमटत होता.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही पाठ्यापुस्तक वाचणे शक्य नसल्याने हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबत सर्व मराठी शाळांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून माहिती देण्यात येत असून सर्व पुस्तके मागे घेण्यात येत आहेत. तोवर मागील वर्षाची पुस्तके बुक बँकद्वारे उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत. परंतु, या सर्व गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दहा-बारा दिवसांत नवीन पुस्तके उपलब्ध होतील
मराठी माध्यमाच्या सहावीच्या पाठ्यापुस्तकात बऱ्याच चुका होत्या. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून संपूर्ण शैक्षणिक जिल्ह्यातील वितरित करण्यात आलेली पाठ्यापुस्तके मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील दहा ते बारा दिवसांत बेंगळूर येथून नव्याने छपाई केलेली पुस्तके उपलब्ध होतील.
– मोहनकुमार हंचाटे (जिल्हाशिक्षणाधिकारी)