शहर-जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची ठाणावापसी

शहर-जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची ठाणावापसी

निवडणुकीवेळी बदली झालेल्यांच्या फेरनियुक्त्या
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्याने त्या अधिकाऱ्यांची पुन्हा बेळगावात नियुक्ती केली आहे. सोमवारी सायंकाळी गृहखात्याने राज्यातील 261 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार स्थानिक व जिल्ह्यांतर्गत अधिकाऱ्यांच्या राज्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात बदल्या केल्या होत्या.  विजापूर, गुलबर्गा, हुबळी-धारवाड येथे या बदल्या झाल्या होत्या. सोमवारी सायंकाळी आयपीएस अधिकारी सौमेंदू मुखर्जी यांनी बदल्यांचा आदेश जारी केला आहे.
बागलकोट डीएसपी विभागात गेलेले विनायक बडीगेर यांची वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात वर्णी लागली आहे. सध्या त्या जागेवर कार्यरत असलेले जगदेवप्पा यांची शाहबाद ग्रामीण पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. बळ्ळारी येथील कौलबाजार पोलीस ठाण्याहून धर्माकर धर्मट्टी यांची सौंदत्ती पोलीस स्थानकात तर चडचण जि. विजापूरहून हसनसाब मुल्ला यांची रायबाग पोलीस स्थानकावर, गुलबर्गा जिल्ह्यातील अशोकनगर पोलीस स्थानकातून महांतेश बसापूर यांची हुक्केरी पोलीस स्थानकात फेरनियुक्ती करण्यात आली आहे. गुलबर्गा येथील सीसीबी पोलीस स्थानकातून उद्यमबागला आलेले दिलीपकुमार सागर यांची गुलबर्गा येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर धरीगौडा पाटील, खानापूर पोलीस स्थानकावर मंजुनाथ नायक तर एपीएमसी पोलीस स्थानकात विश्वनाथ कब्बुरी, खडेबाजार पोलीस स्थानकात दिलीप निंबाळकर यांची नियुक्ती झाली असून एपीएमसीचे खाजा हुसेन व खडेबाजारचे राघवेंद्र यांची गुलबर्ग्याला बदली झाली आहे. शहापूर पोलीस स्थानकावर एस. एस. सीमानी, टिळकवाडी पोलीस स्थानकात परशुराम पुजेरी, मार्केट पोलीस स्थानकावर महांतेश द्यामण्णावर, मुडलगी पोलीस स्थानकात श्रीशैल ब्याकुड, सीसीआरबी विभागात आर. आर. पाटील, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात मंजुनाथ हिरेमठ, वाहतूक उत्तर विभागात श्रीशैल गाभी, हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात टी. बी. निलगार, चिकोडी पोलीस स्थानकात विश्वनाथ चौगुले, बैलहोंगल पोलीस स्थानकात पंचय्या सालीमठ, जिल्हा सीईएन विभागात बी. आर. ग•sकर, उत्तर विभाग आयजीपी कार्यालयात शिवानंद गुडगनट्टी आदी अधिकाऱ्यांची फेरनियुक्ती झाली आहे.