गुंड विशालसिंग एक वर्षासाठी स्थानबद्धतेत

गुंड विशालसिंग एक वर्षासाठी स्थानबद्धतेत

गुंडा कायद्यांतर्गत कारवाईवर शिक्कामोर्तब : उच्च न्यायालयाच्या सल्लागार समितीचा निर्णय
बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यात गुन्हे करणारा गुंड विशालसिंग चव्हाण (वय 25) याच्यावर बेळगाव पोलिसांनी गुंडा कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईवर उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीने शिक्कामोर्तब केले आहे. विशालसिंगला गुलबर्गा कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सोमवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. विशालसिंग हा मूळचा कित्तूर तालुक्यातील चिक्कनंदीहळ्ळीचा. सध्या शास्त्राrनगर परिसरात त्याचे वास्तव्य होते. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या सूचनेवरून खडेबाजारचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र यांनी विशालसिंगवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. विशेष दंडाधिकारीही असणारे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी या प्रस्तावावर निर्णय घेत दि. 30 एप्रिल 2024 रोजी विशालसिंगला गुंडा कायद्याखाली गुलबर्गा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्धतेत ठेवण्याचा आदेश दिला होता. या आदेशावरून उद्यमबागचे पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशालसिंगला अटक केली होती.
बेळगाव परिसरातील अनेक गुन्हेगारांवर यापूर्वीही गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, बेंगळूर येथील सल्लागार समितीसमोर या कारवाईचे समर्थन करण्यात पोलीस दलाला नेहमीच अपयश येत होते. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी मात्र ही कारवाई किती योग्य आहे, हे समितीसमोर पटवून दिले आहे. गुंड विशालसिंगवर 1 खून, खुनाचे 5 प्रयत्न, शस्त्रास्त्रs कायद्यांतर्गत 1, अपहरण प्रकरण 1, लुटमारीचा 1, तडीपारीचा आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करून बेळगावात गुन्हा केल्यासंबंधी 2, महाराष्ट्रात खुनाचा प्रयत्न व शस्त्रास्त्रs कायद्यांतर्गत 2, गोव्यात 1 चोरी प्रकरण असे एकूण 14 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दि. 29 मे 2024 रोजी बेंगळूर येथे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या सल्लागार समितीसमोर या प्रकरणी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी आपली बाजू समर्थपणे मांडली. त्यामुळे सल्लागार समितीनेही गुंडा कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईवर शिक्कामोर्तब केले आहे. सल्लागार समितीने शिक्कामोर्तब केलेले बेळगावातील हे पहिलेच प्रकरण आहे.
आणखी 3-4 जण लिस्टवर
विशालसिंग चव्हाणच्या कारवाया वाढल्या होत्या. त्यामुळेच त्याच्यावर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक स्वास्थ्याला सुरुंग लावणाऱ्या बेळगाव परिसरातील आणखी तीन ते चार जणांवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली. गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. आदींनीही या कारवाईत भाग घेतला आहे.