बेळगाव शहराची दहावी निकालात मुसंडी

बेळगाव शहराची दहावी निकालात मुसंडी

अधिकारी-शिक्षकांच्या परिश्रमाला यश
बेळगाव : दहावी निकालात यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याने निराशा केली आहे. निकालाचा टक्का घसरल्याने नाराजी व्यक्त होत असतानाच बेळगाव शहर विभागाने मात्र दमदार कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शहर विभागाचा निकाल 79.47 टक्के लागला असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात शहर विभाग प्रथम आला आहे. गटशिक्षणाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे शहर विभागाला चांगले यश मिळाले आहे. यावर्षी दहावी परीक्षा कडक बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली. कॉपीला कुठेही वाव न दिल्याने यावर्षीचा निकाल घसरल्याचे सांगितले जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक नसल्याने सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच जिल्हा शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने टीकेची झोड उठविली जात आहे. शैक्षणिक जिल्ह्याने जरी निराशा केली असली तरी बेळगाव शहर विभागाने चांगली मुसंडी मारली आहे. बेळगाव शहर विभागात 8134 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 6464 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे प्रथमच बेळगाव शहर विभागाचा निकाल 79.47 टक्के लागला आहे. गट शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, गट समन्वय अधिकारी आय. डी. हिरेमठ, एसएसएलसीच्या नोडल ऑफिसर परवीन नदाफ यांनी बेळगाव शहर विभागाचे केलेले नियोजन तसेच शाळांचा घेतलेला पाठपुरावा यामुळे विभागाचा चांगला निकाल लागला आहे. सेंट मेरीज हायस्कूलची विद्यार्थिनी तनिष्का नावगेकर हिने 620, केएलएस हायस्कूलची वृंदा पाटील हिने 618 तर गोमटेश हायस्कूलची संपदा सुतार हिने 615 गुण मिळविले आहेत. शहरातील पाच हायस्कूल्सचा 100 टक्के निकाल लागला आहे.

विभाग             निकाल (टक्के)
बेळगाव शहर- – – 79.47
बेळगाव ग्रामीण- – 67.68
खानापूर- – – – – 69.14

अनेक उपक्रम
दहावीचा निकाल वाढावा, यासाठी शहर विभागात अनेक उपक्रम राबविण्यात आले. प्रत्येक शाळांना भेटी देऊन तेथील गुणवत्तेची माहिती घेण्यात आली. ज्या शाळा गुणवत्तेत मागे आहेत, अशा शाळांना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे यावर्षी प्रथमच बेळगाव शहर विभाग शैक्षणिक जिल्ह्यात प्रथम आला आहे.
– लिलावती हिरेमठ (शहर गट शिक्षणाधिकारी)