पदवीपूर्व प्रथम वर्षाला प्रारंभ

पदवीपूर्व प्रथम वर्षाला प्रारंभ

महाविद्यालयीन जीवनाचा श्रीगणेशा : पुन्हा एकदा कॉलेज परिसर गजबजले
बेळगाव : शालेय शिक्षणाचा टप्पा ओलांडून विद्यार्थी पदवीपूर्व कॉलेजमध्ये दाखल झाले आहेत. मागील चार दिवसात पदवीपूर्व कॉलेजीस सुरू झाल्याने पुन्हा एकदा कॉलेज परिसर गजबजला आहे. कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. हायस्कूलमधील शिक्षण पूर्ण करून विद्यार्थ्यांनी एसएसएलसी परीक्षा दिली. यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे पुढील प्रवेश घेतला. सायन्स, कॉमर्स, आर्ट्ससोबतच डिप्लोमा, आयटीआय, नर्सिंग यासह विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यात आला. डिप्लोमा, आयटीआय कॉलेज सुरू होण्यास अजून विलंब असला तरी पदवीपूर्व कॉलेज सुरू झाली आहेत. काही कॉलेज सोमवारपासून तर काही कॉलेज बुधवार-गुरुवारपासून सुरू झाल्याने महाविद्यालयीन परिसर विद्यार्थ्यांनी गजबजला आहे. दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशासाठी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार सोमवार दि. 3 पासून पदवीपूर्व कॉलेज सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी कॉलेजमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव साजरा केला. हायस्कूल व महाविद्यालयीन वातावरणामध्ये फरक असल्याने विद्यार्थ्यांनाही हे नवीन वातावरण भावले.
टप्प्याटप्प्याने सुरू आहे प्रवेशप्रक्रिया
कॉलेज सुरू झाले असले तरी प्रवेशप्रक्रिया मात्र टप्प्याटप्प्याने सुरू आहे. यावर्षी दहावीचा निकाल अतिशय कमी लागल्याने पदवीपूर्व कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही कमी आहे. पुरवणी परीक्षा-2 होणार असून त्यामधील उत्तीर्णांना पुन्हा प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे पदवीपूर्व कॉलेजची प्रवेशप्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू राहणार  आहे.