सावध ऐका, आरोग्याच्या हाका

सावध ऐका, आरोग्याच्या हाका

एके काळी श्रीमंतांचे आजार अशी ओळख असलेले मधुमेह आणि उच्च रक्तदाब आता सर्वसामान्य नागरिकांनाही ग्रासत आहेत. या आजारांबाबतची राज्याची परिस्थिती चिंताजनक म्हणावी अशीच आहे. राज्यात 100 माणसांमागे 13 उच्च रक्तदाबाने, तर दोघे जण मधुमेहाने ग्रस्त आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून 18 वर्षांवरील नागरिकांची तपासणी सुरू आहे, त्यामध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. राज्यात केवळ मोठ्या शहरांतच नव्हे, तर मध्यम आणि छोट्या शहरांमध्येही या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. ‘निरोगी आरोग्य तरुणांचे, वैभव महाराष्ट्राचे’ ही आरोग्य तपासणीची मोहीम राज्याच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत आहे.
17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 1 कोटी 14 लाख 60 हजार तरुणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 14 लाख 82 हजार तरुणांना उच्च रक्तदाब असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर 2 लाख 35 हजारहून अधिक तरुण मधुमेहाने ग्रस्त झालेले आढळले. मुंबईसारख्या शहरात तर मधुमेहामुळे हृदयविकाराची शक्यता बळावू लागली आहे. मुंबईत दररोज 14 जण हृदयविकाराने मृत्युमुखी पडतात. यात वृद्धांचे प्रमाण अधिक असले तरी त्यात चाळीशीतील तरुणांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये धडधाकट तरुणांनाही हृदयविकार जडत आहे. नियमितपणे व्यायामशाळेत घाम गाळणारे काही तरुण अलीकडे या विकाराने बळी पडल्याची उदाहरणे आहेत.
काही वर्षांपूर्वी चाळीशीनंतर नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेण्याविषयीची जनजागृती होऊ लागली होती. अर्थात, त्यात वैद्यकीय क्षेत्र आणि वैद्यकीय विमा पुरवणार्‍या कंपन्यांचा मोठा सहभाग होता. त्यांना नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा आपल्या व्यवसायाच्या गणिताशी अधिक देणेघेणे होते. आता परिस्थिती बदलली आहे. तरुण वयातही नियमितपणे आरोग्य तपासणी करावी, अशी परिस्थिती येऊ घातली आहे. बदललेली जीवनशैली, सकस आहाराची कमतरता, कामाच्या अनियमित वेळा, प्रवासाची दगदग, नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष; या सर्व कारणांमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या व्याधी अगदी सहजपणे तरुणांमध्ये जडत आहेत. अर्थात, काही तरुणांमध्ये मधुमेहासारखा आजार अनुवंशिक असल्याचे आढळले; पण त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मधुमेहाकडे सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष केल्यामुळे तरुणांना थकवा, डोळ्यांच्या विकारांसह हृदय आणि मूत्रपिंडाचेही आजार जडलेले आढळले.
‘आरोग्यम् धनसंपदा’ असे असले तरी धनसंपदेकडे ज्या गांभीर्याने आणि पोटतिडकीने पाहिले जाते, तसे ते आरोग्याकडे पाहिले जात नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे जगाच्या कानाकोपर्‍यातील बातमी आज जवळच प्रत्येक घटकापर्यंत पोहोचते. तसेच आरोग्यविषयक जागरूकताही या माध्यमातून सातत्याने होत असते. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम घातक ठरू शकतात, हे पटूनही आरोग्याची काळजी घेण्याकडे मात्र तितकीशी तत्परता दाखवली जात नाही. किंबहुना, अनेक तरुण डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात. अगदीच पर्याय नसेल तर वैद्यकीय तपासणी करून घेतली जाते. उदरनिर्वाहाची गरज आणि आरोग्यविषयक जागरूकता यामध्ये नेहमीच उदरनिर्वाहाला प्राधान्य दिले जाते. ते चुकीचेही नाही; पण ‘शरीर तंदुरुस्त, मन तंदुरुस्त’ हा मंत्र जपण्याची नितांत गरज आहे.
आरोग्याचे महत्त्व प्रत्येकालाच पटलेले आहे; पण त्यासाठी एखादी व्याधी जडू न देणे, याची खबरदारी घ्यावी लागते याकडे कुठेतरी दुर्लक्ष होते. केवळ आरोग्य विमा काढला म्हणजे आपण सुरक्षित झालो, अशी भावना अलीकडच्या काळात वाढीस लागली आहे. अर्थात, असा विमा व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या द़ृष्टीने महत्त्वाचा असतोच. हा विमा त्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च भागवत असला तरी तो पूर्णतः माणसाला निरोगी बनवू शकत नाही. त्यासाठी नियमित व्यायाम सकस आहार अणि चित्तवृत्ती आनंदी ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.
उच्च रक्तदाब आणि मधुमेह जर अनुवंशिक नसतील, तर ते सहजपणे टाळता येण्यासारखे आहेत, असे वैद्यकशास्त्र सांगते. सुशिक्षित आणि सुजाण नागरिक यावर विश्वासही ठेवतात; पण निरोगी आयुष्यासाठी जी जीवनशैली आचरणात आणायला हवी, त्याकडे मात्र गांभीर्याने पाहिले जात नाही. उद्याचे उद्या पाहू, अशी जी मनोवृत्ती तयार झाली आहे ती जाणीवपूर्वक बदलावी लागेल. आवश्यक असलेली किमान झोप आणि सकस आहार या दोन गोष्टी जरी काटेकोरपणे पाळल्या तर या व्याधींना सहजपणे दूर ठेवता येते, असे डॉक्टर सांगतात. मात्र, मोबाईल नामक उपकरणाने माणसाची आठ तासांची झोप हिरावून घेतली आहे. एखादे व्यसन जडावे तसे मोबाईलचे अनेकांच्या बाबतीत झाले आहे. मोबाईलमुळे निद्रानशाचा विकार जडत आहे आणि तो रक्तदाबाला निमंत्रण देणारा ठरत आहे.
या आरोग्य तपासणीत बहुतांशी तरुण मोबाईलचा अतिवापर करतात, असे आढळून आले. त्यामुळे त्यांना या वयातच उच्च रक्तदाबाचे निदान झाले. तरुण पिढी या मोबाईलच्या पूर्णपणे आहारी गेल्याचे दिसून येते. या मोबाईलच्या विश्वात रमण्याचा आनंद जरी क्षणिक असला तरी तो त्यांना हवा असतो. त्यासाठी झोपेचे खोबरे करण्याची किंमतही मोजण्याची तयारी तरुणच नव्हे, तर साठीच्या घरात असलेल्या नागरिकांची असते आणि हीच बेफिकिरी आता जीवाशी खेळू लागली आहे. शालेय विद्यार्थीदेखील मोबाईलच्या जाळ्यात सापडले आहेत. शाळेतील हजेरीनंतर मुलांचा सर्वाधिक वेळ मोबाईल पाहण्यात जातो, त्यामुळे त्यांनाही मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे मोबाईलचा हा अतिवापर टाळण्यासाठी शालेय स्तरावरही प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मुले आपल्या पालकांपेक्षा शिक्षकांच्या सूचना गांभीर्याने घेतात, हा अनुभव आहे. त्याचबरोबर आरोग्यदायी जीवनासाठी अमुक गोष्टी करा किंवा करू नका, याचा प्रसार सरकार ते खासगी पातळीवरून सातत्याने सुरू असतो. पण ‘मोबाईल गरजेपुरताच वापरा, त्यापासून सुरक्षित अंतर ठेवा,’ असे सांगितले जात नाही. जोपर्यंत मोबाईलच्या अतिवापराचे द़ृश्य परिणाम समोर येत नाहीत तोपर्यंत लोकांचे डोळे उघडणार नाहीत. पण प्रश्न आहे तो अशी परिस्थिती येऊ द्यायची का, याचा. वेळीच सावध होऊन मोबाईलच्या मोहमयी जगात दिवसभरातील किती तास रमायचे, हा ज्याचा त्याचा विषय आहे. राज्याचे आरोग्य समजायचे असेल तर प्रत्येकाच्या आरोग्याचा तपशील राज्य सरकारकडे तयार असायला हवा. जेणेकरून नागरिकांच्या आरोग्यविषयक जनजागृती आणि आजारांवरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारला ठोस पावले उचलता येतील.
The post सावध ऐका, आरोग्याच्या हाका appeared first on पुढारी.

एके काळी श्रीमंतांचे आजार अशी ओळख असलेले मधुमेह आणि उच्च रक्तदाब आता सर्वसामान्य नागरिकांनाही ग्रासत आहेत. या आजारांबाबतची राज्याची परिस्थिती चिंताजनक म्हणावी अशीच आहे. राज्यात 100 माणसांमागे 13 उच्च रक्तदाबाने, तर दोघे जण मधुमेहाने ग्रस्त आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून 18 वर्षांवरील नागरिकांची तपासणी सुरू आहे, त्यामध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. राज्यात केवळ मोठ्या …

The post सावध ऐका, आरोग्याच्या हाका appeared first on पुढारी.

Go to Source