सहकारी बँकिंगमध्ये कर्ज वसुलीत दुजाभाव नको : सहकार आयुक्त अनिल कवडे

सहकारी बँकिंगमध्ये कर्ज वसुलीत दुजाभाव नको : सहकार आयुक्त अनिल कवडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील नागरी सहकारी बँकिंग व्यवस्थेला सध्याच्या स्पर्धात्मक स्थितीत पुढे जायचे असेल तर सर्व बँकांनी एकत्र येऊन नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करण्यासाठी विचारमंथन करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले. सहकारी बँकिंग क्षेत्रात गटातटाचे राजकारण नसावे आणि कर्ज रक्कम वसुलीच्या कारवाईमध्ये दुजाभाव असता कामा नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्यावतीने 70 व्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाचे ऑनलाईन आयोजन दि.१४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आलेले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी (दि.१४) सायंकाळी कवडे यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी नागरी सहकारी बँकांच्या विकासामध्ये सहकार खात्याचे योगदान या विषयावरील व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल कारंजकर आणि सर्व संचालक मंडळ तसेच पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी आणि दूध डेअ-याचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या निमित्ताने दररोज विविध मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कवडे म्हणाले, केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय प्रथमच अस्तित्वात आणल्यानंतर सहकार क्षेत्रासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना आणत ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला सहकाराच्या माध्यमातून चालना देण्यासाठी काही चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्यासाठी राज्यातील विकास सोसायटी, जिल्हा बँका,पतसंस्था, साखर कारखाने, सूतगिरणी आदींमध्ये सकारात्मक बदलासाठी राज्यातील सहकार क्षेत्रानेही योग्य ती पावले उचलून पुढे काम करण्याची आवश्यकता आहे. ज्याद्वारे सहकार क्षेत्रामधील विश्वासार्हता वाढीला लागून आणखी चांगले काम होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गांवपातळीवर विकास सोसायट्यांमध्ये व्यावसायिकता आल्यास गावे स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल असे मत व्यक्त करून ते म्हणाले, केंद्र सरकारने विविध योजना आणून विकास सोसायट्यांचे संगणकीय करण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे. स्पर्धात्मक स्थितीत पुढे जाण्यासाठी बॅंक्स असोसिएशन व फेडरेशनने एकमेकांमध्ये संवाद वाढवण्याची गरज आहे. ज्या बँकांमध्ये चांगले उपक्रम आहेत ते इतरांनीही अंगीकारले पाहिजेत आणि उणीवा, दोष असतील तर ते दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. ग्राहकांना काळानुरूप लागणाऱ्या गरजा पूर्ण केल्यास सहकार क्षेत्राशी असलेला ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. बँकांनी त्यांचा सीडी रेशोमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी मी राज्यात विभागवार सहकारी बँकांच्या आढावा बैठका घेतल्या आणि काही चांगले उपक्रम करण्याचे नियोजन केले.
बँकांनी कर्ज वाटप वाढविताना विनातारण कर्ज देऊ नये यासाठीसुद्धा सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. कमीत कमी व्यवहारांमध्ये जास्त उलाढाल असे सूत्र न अवलंबता अधिकाधिक गरीब व मध्यमवर्गीयांना त्यांच्या कर्जाची परतफेडीची क्षमता बघून जास्तीत जास्त कर्ज वितरणावर भर देण्याची गरज आहे आणि सहकार क्षेत्राचे तेच धोरण असले पाहिजे असे मला वाटते. कलम 101 अन्वये सहकारी बँकांना वसुलीचे दाखले प्राप्त होतात. पण दोन-दोन वर्ष उलटूनही सबंधित व्यक्ती आपल्या गटाचा आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याचे टाळले जाते, जे सहकार क्षेत्राला मारक आहे. या उलट दुसऱ्या गटाचा माणूस असल्यास 101 चा वसुली दाखला मिळताच त्याच्यावर रक्कम वसुलीसाठी जप्तीची कारवाई करण्यासाठी आग्रह धरला जातो ही स्थिती बदलणे आवश्यक आहे.
अन्यथा सहकार क्षेत्राला त्याचे परिणाम भोगावे लागलेले आहेत. गटातटाचे राजकारण सहकारात नकोय आणि कारवाईमध्ये दुजाभाव नको आहे. या उलट निर्णयात सकारात्मकता अवलंबून आणि योग्य वेळी असलेले धोके ओळखून त्यामध्ये सुधारणा केल्यास सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात पुढे जाईल. त्या दृष्टीने सर्व बँका, असोसिएशन, फेडरेशनने कटाक्षाने लक्ष द्यावे आणि चुकीच्या गोष्टी होऊ नयेत यावर विचारमंथन करून चांगल्या कामाची अंमलबजावणी करावी असेही त्यांनी नमूद केले. स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये बँक असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सुभाष मोहिते म्हणाले की संघटनेने सहकार सप्ताह 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या काळात राबविण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये सभासद बँका सहभागी झालेल्या असून सहकार घोषवाक्य असलेले एसएमएस संदेश त्यांच्या सर्व सभासदांना देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यातून किमान एक कोटीच्या आसपास हे संदेश जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2025 हे संपूर्ण जगात सहकार वर्षे म्हणून साजरे करायचे युनोने ठरवलेले आहे. त्या दृष्टीने आत्तापासूनच चर्चा झाल्यास भारत आपला त्यामध्ये वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सहभागी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आयुक्त कवडे आणि बॅंक्स असोसिएशनच्या पदाधिका-यांनी उत्तरे दिली
The post सहकारी बँकिंगमध्ये कर्ज वसुलीत दुजाभाव नको : सहकार आयुक्त अनिल कवडे appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील नागरी सहकारी बँकिंग व्यवस्थेला सध्याच्या स्पर्धात्मक स्थितीत पुढे जायचे असेल तर सर्व बँकांनी एकत्र येऊन नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करण्यासाठी विचारमंथन करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले. सहकारी बँकिंग क्षेत्रात गटातटाचे राजकारण नसावे आणि कर्ज रक्कम वसुलीच्या कारवाईमध्ये दुजाभाव असता कामा नये अशी अपेक्षाही …

The post सहकारी बँकिंगमध्ये कर्ज वसुलीत दुजाभाव नको : सहकार आयुक्त अनिल कवडे appeared first on पुढारी.

Go to Source