ग्रीन कार्डची ट्रम्प यांची गॅरंटी भारतीयांच्या फायद्याची

वॉशिंग्टन डी सी : अध्यक्षीय निवडणुकीत विजय झाला, तर अमेरिकेत उच्च शिक्षण घेणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना त्यांनी कोणतेही वेगळे प्रयत्न न करता ग्रीन कार्ड देण्याची गॅरंटी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली असून, भारतातील सोशल मीडियावर त्याचे स्वागत झालेले दिसते. पण, ग्रीन कार्डसाठी हजारो भारतीय तरुणांचे अर्ज वर्षांनुवर्षे प्रतीक्षेत असताना नव्याने येणार्‍या प्रत्येक …

ग्रीन कार्डची ट्रम्प यांची गॅरंटी भारतीयांच्या फायद्याची

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी सी : अध्यक्षीय निवडणुकीत विजय झाला, तर अमेरिकेत उच्च शिक्षण घेणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना त्यांनी कोणतेही वेगळे प्रयत्न न करता ग्रीन कार्ड देण्याची गॅरंटी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली असून, भारतातील सोशल मीडियावर त्याचे स्वागत झालेले दिसते. पण, ग्रीन कार्डसाठी हजारो भारतीय तरुणांचे अर्ज वर्षांनुवर्षे प्रतीक्षेत असताना नव्याने येणार्‍या प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांना हा अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना कसा देणार, या व्यावहारिक मुद्द्यावर मात्र एकूणच संदिग्धता आढळून येत आहे.
आतापर्यंत बेकायदेशीर स्थलांतराविरोधात कडाडून टीका करणारे, इतकेच नव्हे, तर कायदेशीर मार्गाने एच वन बी व्हिसावर येणार्‍या विद्यार्थ्यांच्या व्हिसावरही आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत कडक निर्बंध घालणारे ट्रम्प यांची ही नवी भूमिका सुखद धक्का देणारी असली, तरी आश्चर्यात टाकणारी आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा बदल राजकीय लाभाच्या हेतूने घेतलेला असावा, अशी टीकाही आता झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
यंदाची ही निवडणूक अटीतटीची होत असल्याने ज्या राज्यात अधिक चुरस आहे, अशा ठिकाणी अल्प मताधिक्याने दोन्हींपैकी कोणताही उमेदवार निवडून येऊ शकतो. यापैकी काही राज्यांत भारतीय अमेरिकन मतदारांची संख्या लक्षणीय आहे . त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी जो बायडेन-ट्रम्प यांच्यात अहमहमिका आहे.
भारत आणि चीनचे जे विद्यार्थी इथे शिकायला येतात, त्यांना अमेरिकेत एखादी नवीन संकल्पना राबवून नवीन कंपनी काढायची असते. पण, त्यांना इथे राहता येत नाही. त्यामुळे ते भारत वा चीनमध्ये परततात आणि अब्जाधीश होतात. आपण त्यांच्या टॅलेन्टला मुकतो, असे ट्रम्प यांचे म्हणणे असून, त्यासाठी ते या विद्यार्थ्यांना ग्रीन कार्डाची आणि पर्यायाने अमेरिकन नागरिकत्वाची हमी देऊ इच्छित असावेत. मात्र, बायडेन यांच्या प्रचार यंत्रणेने हे पोकळ आश्वासन असल्याचे म्हटले असून, निवडणुकीच्या तोंडावर पुढे केलेले ते गाजर ठरू नये, अशी अपेक्षा आहे. एम्प्लॉयमेंट बेस्ड ग्रीन कार्डसाठी असलेल्या प्रतीक्षेचा कालावधी तब्बल 137 वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. यात तथ्य असेल, तर नव्याने येणार्‍या सर्व परदेशी विद्यार्थ्यांना या व्यवस्थेत कसे सामावून घेणार, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळायला हवे.
अमेरिकेत 10 लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थी
अमेरिकेत सध्या सुमारे 10 लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . त्यात सर्वाधिक (सुमारे 3 लाख) भारतीय आणि चीनचे विद्यार्थी आहेत . ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ट्रम्प यांनी एका पॉडकास्टींगच्या फंडरेझिंग कार्यक्रमात ही गॅरंटी देण्याचे धाडस दाखविले आहे, या कार्यक्रमाला त्यांच्या प्रचारसाठी निधी देणारे गुंतवणूकदार आणि उद्योग व्यवसायातील नामवंत हजर होते, उच्च शिक्षण आणि कौशल्य असलेले बुद्धिमान तरुण आम्हाला हवे आहेत. आमची ही गरज तुम्ही कशी पुरी करू शकाल, या त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी ग्रीन कार्ड देण्याचा प्रस्ताव मांडला. बाय अमेरिकन गुडस, हायर अमेरिकन, अमेरिका फर्स्ट, मेक अमेरिका ग्रेट अगेन अशा सूत्रांवर ट्रम्प आपल्या प्रचारात भर देत आले आहेत. आपल्या या निष्ठावंत मतपेढीचा रोष ओढवून घेण्याचे धाडस त्यांनी आता केले आहे. त्यांच्या मूळ भूमिकेला त्यामुळे त्यांनीच छेद दिला आहे.