पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया लांबणार?

कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्णयानुसार या वर्षापासून राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) मिळणारे गुण पीएच.डी. प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत; परंतु ‘नेट’चा पेपरच रद्द झाल्याने विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांची पीएच.डी.ची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यूजीसीची काही दिवसांपूर्वी बैठक होऊन ‘नेट’संदर्भात निर्णय झाला. त्यानुसार 27 व 28 …

पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया लांबणार?

प्रवीण मस्के

कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्णयानुसार या वर्षापासून राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) मिळणारे गुण पीएच.डी. प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत; परंतु ‘नेट’चा पेपरच रद्द झाल्याने विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांची पीएच.डी.ची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
यूजीसीची काही दिवसांपूर्वी बैठक होऊन ‘नेट’संदर्भात निर्णय झाला. त्यानुसार 27 व 28 मार्चला परिपत्रक काढले आहे. यापूर्वी विद्यापीठांकडून पीएच.डी. प्रवेशासाठी ‘पेट’ ही परीक्षा घेतली जात होती. विद्यार्थ्यांच्या वेळ आणि पैशाची बचत व्हावी, यासाठी ‘नेट’ला प्रवेश परीक्षेचा दर्जा देण्यात आला आहे. नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ज्युनिअर रिसर्च फेलो (जीआरएफ) सहायक प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी पात्र ठरतात. तसेच त्यांना नवीन नियमानुसार पीएच.डी. प्रवेश मिळणार आहे. त्यांना विद्यापीठाची वेगळी परीक्षा द्यावी लागणार नाही.
‘नेट’च्या गुणांवर विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे. शिवाजी विद्यापीठाची 2024-25 ची पीएच.डी.ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठ संलग्न 295 महाविद्यालयांकडून 36 विषयांच्या प्रवेश जागांची माहिती मागवली आहे. 26 जूनपर्यंत माहिती प्राप्त झाल्यावर विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. गेल्यावर्षी 210 जागा होत्या. यंदा संलग्न महाविद्यालयांचा समावेश केल्याने उपलब्ध जागा व मार्गदर्शकांची संख्या वाढणार आहे.
शैक्षणिक सत्रास प्रारंभ होऊन महाविद्यालये सुरू झाली आहेत. यूजीसी-नेटची परीक्षा पेपरफुटीच्या कारणामुळे रद्द केली आहे. फेरपरीक्षेबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळे पीएच.डी. प्रवेशासाठी तयारी करणारे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. नेट परीक्षा रद्द झाल्याने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेसाठी किती कालावधी लागणार आहे, हे गुलदस्त्यातच आहे. नेटची पुन्हा परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांना नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर पीएच.डी.साठी प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थी दुहेरी संकटात सापडले आहेत.(समाप्त)

नेट परीक्षा उत्तीर्ण असणार्‍या विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी प्रवेश मिळणार आहे; परंतु नेटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. परीक्षा घेणार्‍या केंद्रीय यंत्रणांच्या चुकांची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागत आहे. आधी ‘नीट’ त्यानंतर ‘नेट’चा पेपर फुटल्याने शिक्षण विभागाची लक्तरे निघाली आहेत. याचा सरकारनी गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.
– धनश्री स्वामी, पीएच.डी. परीक्षार्थी