युद्धनीती : लढाई कुणाची, बळी कोण?
ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
रशिया आणि युक्रेन यांच्यातील रणसंग्राम अडीच वर्षे उलटूनही कायम आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचे हजारो सैनिक मारले गेले आहेत. परिणामी, या देशांना आता सैनिकांची कमतरता भासत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यावर उपाय म्हणून दक्षिण आशियातील भारत, श्रीलंका, नेपाळमधील लोकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून, आपल्या देशात आणून सैन्यात ढकलले जात आहे. सीबीआयला अशी 35 प्रकरणे सापडली आहेत.
भारतीय नागरिकांना रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रात ढकलणार्या मानवी तस्करी टोळीशी संबंधित तीन आरोपींविरुद्ध इंटरपोल रेड नोटीस जारी करण्याचा विचार सध्या सीबीआयकडून केला जात आहे. मार्च महिन्यामध्ये सीबीआयने देशभरात कार्यरत असलेल्या मानवी तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. यामध्ये आकर्षक नोकर्यांच्या बहाण्याने भारतीय तरुणांना विदेशात नेऊन तेथे रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भाग पाडण्यात येत होते. या प्रकरणातील आरोपी फैसल खान याने आपल्या यूट्यूब चॅनलचा वापर भारतीयांना रशियन सैन्यात सुरक्षारक्षक किंवा सहायक म्हणून भरती करण्यासाठी केला. सीबीआयला अशी 35 प्रकरणे सापडली आहेत, ज्यात इंटरनेट मीडिया चॅनलद्वारे तरुणांना रशियात नेण्यात आले होते. त्यांना लढाऊ भूमिकांसाठी प्रशिक्षण दिले जात होते, असे सीबीआय एफआयआरमध्ये म्हटले आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अडीच वर्षे होत आली तरी संपण्याचे नाव घेत नाहीये. या युद्धामध्ये दोन्हीही देशांची अपरिमित हानी झालेली आहे. जागतिकस्तरावर विविध व्यासपीठांवर हे युद्ध रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत विचारमंथन झाले; पण त्यामध्ये कोणतेही यश आलेले नाही. उलटपक्षी आता रशियन सैन्य पुन्हा एकदा युक्रेनवर आक्रमक कारवाई करताना दिसत आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांच्या असंख्य सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन्हीही देशांना सैनिकांची प्रचंड कमतरता भासू लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही कमतरता भरून काढण्यासाठी रशिया अनेक परदेशी नागरिकांना जास्त वेतन आणि रशियन नागरिकत्व देऊ करत आहे. अशा आमिषांना भुलून रशियामध्ये दाखल होणार्या कामगारांना सैन्यात सहायक म्हणून भरती केले जात आहे आणि युद्धाच्या आघाडीवर पाठवले जात आहे. साधारणतः, रशियामध्ये या नागरिकांना दरमहा 45 हजार रुपये दिले जातात. रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या भागात मदतनीस आणि पोर्टर म्हणून काम करणारे नागरिक सुमारे 1 लाख 60 हजार रुपये दरमहा कमावतात.
भारतीय लष्करात अग्निवीर योजना लागू झाल्यानंतर नेपाळी नागरिकांना गोरखा रेजिमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे हे सैनिक रशियाकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. गतवर्षी नेपाळ सरकारने रशियाच्या सैन्यात सेवा करणारे सहा नेपाळी नागरिक युक्रेनसोबतच्या युद्धात मारले गेले असल्याची माहिती जाहीर केली होती. तसेच नेपाळ सरकारने रशियाला नेपाळी नागरिकांना सैन्यात भरती न करण्याची विनंती केली होती. ‘काठमांडू पोस्ट’ वृत्तपत्रानुसार, सुमारे 200 हून अधिक नेपाळी सध्या रशियन सैन्यात सेवा देत आहेत. नेपाळ केवळ द्विपक्षीय करारांतर्गत नेपाळी नागरिकांना भारतीय आणि ब्रिटिश सैन्यात भरती करण्यास परवानगी देतो. याचाच अर्थ या नागरिकांना बेकायदेशीररीत्या भरती केले जात आहे.
दुसरीकडे, श्रीलंकेतील गृहयुद्धाचा अनुभव आणि अधिक पैसा कमावण्याची इच्छा श्रीलंंकेच्या लष्कराच्या अनेक आजी-माजी सैनिकांना रशियाकडे नेत आहे. डिसेंबर 2023 मध्ये 700 नेपाळी नागरिक रशियन सैन्यात काम करत होते. शेकडो श्रीलंकन आणि सुमारे 100 हून अधिक भारतीय नागरिक रशियन सैन्यात सामील आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारत, नेपाळ आणि श्रीलंकेतून टुरिस्ट व्हिसावर रशियाला जाणार्यांची संख्या वाढली आहे. 2021 मध्ये 7,132, तर 2022 मध्ये 8,275 भारतीय रशियात गेले. 2023 मध्ये पर्यटकांसाठी ई-व्हिसा प्रणाली सुरू केली आणि 1,039 नेपाळी नागरिक पर्यटक व्हिसावर रशियाला गेले. काही यूट्यूबर्स, ब्लॉगर्स, मध्यस्थ यामध्ये सामील आहेत. युक्रेन युद्धात आतापर्यंत नेपाळचे 12, श्रीलंकेचे 5 आणि 2 भारतीय नागरिक मारले गेले आहेत.
भारताचे परराष्ट्र मंत्रालय रशियन सैन्यात सेवा करणार्या भारतीयांना परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. काही भारतीयांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात आली आहे; तर उर्वरितांबाबत रशियन अधिकार्यांशी चर्चा सुरू आहे. नेपाळ आणि श्रीलंकेला अद्याप याबाबतीत भारताइतके यश मिळालेले नाही.
रशिया-युक्रेन युद्ध अनेक दिवस सुरू राहणार असल्याने येत्या काळात अनेक परदेशी नागरिक या देशांमधील सैन्यात सामील होणार, हे निश्चित आहे. रशियाची लोकसंख्या सैनिकांच्या गरजेपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत रशिया परदेशी नागरिकांना अधिक पैशाची ऑफर देऊन आपल्या सैन्यात समाविष्ट करणे सुरू ठेवेल. अधिक कमाई आणि रशियन नागरिकत्व मिळण्याची आशा दक्षिण आशियातील नागरिकांना नेहमीच रशियात जाण्याकरिता प्रोत्साहन देत आहे आणि यापुढेही देत राहील.
वास्तविक पाहता, भारत, श्रीलंका, नेपाळमधून गेलेले जे नागरिक रशियन सैन्यामध्ये अडकतात, त्यांना केवळ मृत्यू किंवा गंभीर जखमाच परत आणू शकतात. अनेकवेळा सांगितले जाते की, तुम्ही एक मजूर म्हणून जात आहात; पण नंतर फसवून त्यांना सैनिकी काम करण्यास भाग पाडले जाते. यामुळे भारतीयांनी रशियन सैन्यात भरती होणे थांबवले पाहिजे. वरील पद्धतींशिवाय रशियाने सैनिकांची कमतरता पूर्ण करण्यासाठी वॅगनर नावाचा, एक भाडोत्री सैनिकांचा ग्रुपसुद्धा वापरला होता. आजही ही वॅगनगर आर्मी रशिया-युक्रेन युद्धात कार्यरत आहे.
याशिवाय आणखी एक नावीन्यपूर्ण पद्धत वापरली जात आहे. ती म्हणजे रशियाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या हजारो गुन्हेगारांना सैन्यात भरती केले जात आहे. त्यांनी सैन्यात चांगले काम केले, तर त्यांची शिक्षा रद्द होऊ शकते किंवा कमी होऊ शकते, असे प्रलोभन त्यांना दाखवले जात आहे.
युक्रेनचा विचार करता, या देशाला युरोप आणि अमेरिकन सैनिकांनी मदत केली नाही; मात्र शस्त्रपुरवठा मोठ्या प्रमाणात केला आहे. याशिवाय अमेरिका आणि युरोपचे स्पेशल फोर्सेसचे काही अधिकारी युक्रेनच्या सैन्याला तज्ज्ञांचा सल्ला देण्यासाठी किंवा डावपेचांची मांडणी, नियोजनाची गुणवत्ता किंवा ट्रेनिंगची गुणवत्ता सुधारण्याकरिता मदत करत आहेत. असे अधिकारी हजारोंच्या संख्येने युक्रेन सैन्यामध्ये आहेत; पण ते प्रत्यक्ष लढण्याचे काम करत नाहीत. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर ‘इंटरनॅशनल रिजन ऑफ टेरिटोरियल डिफेन्स ऑफ युक्रेन’ नावाचे एक सैनिकी दल युक्रेनमध्ये उघडले होते. यामध्ये युरोपमधून आणि रशिया विरोधातल्या देशांमधून हजारो भाडोत्री सैनिकांनी प्रवेश केला. ते युक्रेनच्या बाजूने रशियाच्या विरुद्ध लढत होते आणि आहेत. या सैनिकांमध्ये काही रिटायर्ड सैनिक, काही भाडोत्री सैनिक आणि काही केवळ रशियाने त्यांच्या देशावर अत्याचार केल्यामुळे, रशियाच्या विरुद्ध लढाईस तयार झालेले युवक सामील होते. त्यांनी अनेक लढायांमध्ये छोट्या-मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला व अजूनही घेत आहेत. असे म्हटले जाते की, 50 वेगवेगळ्या देशांतील 20 हजारांहून जास्त परकीय नागरिकांनी इंटरनॅशनल रिजन ऑफ टेरिटोरियल डिफेन्स ऑफ युक्रेनमध्ये प्रवेश केला. त्यांना युक्रेनच्या बाजूने लढता यावे म्हणून युक्रेनने आपल्या देशाच्या कायद्यामध्ये बदल केला आणि त्यांना युक्रेनच्या बाजूने लढण्याकरिता परवानगी दिली होती. त्यांना नंतर गरज पडली तर युक्रेनचे नागरिकत्वही दिले जात होते. युक्रेनच्या बाजूने रशियापासून स्वतंत्र असलेल्या कझाकिस्तान, किरगिजस्थान, बेलारूस यासह अनेक देशांचे नागरिक लढत होते.
अर्थात, भाडोत्री सैनिक हा प्रकार केवळ रशिया-युक्रेनमध्येच अस्तित्वात आला आहे, असे नाही. फ्रान्समध्ये ‘फ्रेंच लीजन’ नावाचा एक सैनिकी प्रकार आहे. त्याला ‘फ्रेंच फॉरेन सोल्जर्स’ नावाने ओळखले जाते. या सैनिकांचे नेतृत्व फ्रान्स सैन्याचे अधिकारी करतात; परंतु प्रत्यक्षात ते सैनिक युरोप किंवा इतर देशांतून आलेले खासगी भाडोत्री सैनिक असू शकतात. या फ्रेंच फॉरेन सोल्जर्सने दीड हजारहून जास्त सैनिक लढण्याकरिता युक्रेनमध्ये पाठवले आहेत.
हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहणार असल्याने सद्यस्थितीत रशियात परदेशी भाडोत्री सैनिक आणि युद्धग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी परदेशी कामगारांची प्रचंड मागणी आहे. भाडोत्री सैनिक आणि परदेशी कामगारांना त्यांच्या देशात मिळणार्या पगारापेक्षा तिप्पट पगार दिला जात असल्यामुळे अनेक परदेशी नागरिक भरती होत आहेत. या युद्धामुळे, रशियन सैन्यात 2021 मध्ये 19,02,758 सैनिक होते, जे 2022 मध्ये 20,39,758 आणि 2023 मध्ये 22,09,130 पर्यंत वाढलेत. परंतु, लढाईत मारले जाण्याची शक्यता पाहून हे नागरिक आता आपल्या देशात परत जाण्याकरिता मदत मागत आहेत.