खगोलीय माहिती देणारे 600 वर्षांपूर्वीचे घड्याळ

खगोलीय माहिती देणारे 600 वर्षांपूर्वीचे घड्याळ

प्राग : जगभरात अनेक प्रकारची घड्याळे पाहायला मिळतात. मात्र, झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग शहरात सहाशे वर्षांपूर्वीचे एक असे घड्याळ आहे, जे वेळेची नव्हे, तर खगोलीय घटनांची माहिती देते. सन 1410 मध्ये हे घड्याळ बसवण्यात आले होते. ते सूर्य व चंद्राची स्थिती तसेच पवित्र दिवसांची माहिती देते.
प्राग हे जगातील सुंदर शहरांपै.की एक आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक इमारतीही आहेत. जगभरातील पर्यटक हे शहर पाहण्यासाठी येत असतात. त्यांच्या आकर्षणाच्या स्थळांमध्ये हे घड्याळही आहे. हे एक ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल वॉच’ असून, लोकांना खगोलीय सूचना देण्यासाठी सहाशे वर्षांपूर्वी त्याची निर्मिती करण्यात आली होती. या घड्याळाला ‘प्राग ओर्लोज’ या नावाने ओळखले जाते.
प्रागच्या ओल्ड टाऊन स्क्वेअरमध्ये असलेल्या ओल्ड टाऊन हॉलवर हे भव्य घड्याळ आहे. या घड्याळाच्या आसपास कॅथॉलिक संतांच्या मूर्ती आणि बारा राशींची चिन्हे आहेत. हे घड्याळ सूर्य-चंद्राची स्थिती, ग्रहांची स्थिती, वेगवेगळ्या राशींमध्ये नक्षत्रांचा प्रवेश, अशा अनेक खगोलीय घटनांच्या सूचना देते. विशेष म्हणजे ज्या वेळेपासून हे घड्याळ बसवण्यात आले आहे, त्या वेळेपासून हे घड्याळ निरंतर सुरू आहे.