परभणी: मानोली येथे पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

परभणी: मानोली येथे पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

मानवत, Bharat Live News Media वृत्तसेवा:  मानोली येथे मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या सुनीता लव्हाळे या शेतमजूर महिलेचा मृतदेह तब्बल १५ तासांनी आज (दि. ११) सकाळी ७ वाजता झोडगाव शिवारातील ओढ्यात सापडला.
याबाबत माहिती अशी की, मानवत शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी (दि. १०) दुपारी ४ च्या सुमारास तब्बल २ तास पावसाने थैमान घातले होते. अचानक पडलेल्या मोठ्या पावसामुळे ओढा ओलांडून घराकडे जाणाऱ्या मानोली येथील दोन शेतकरी महिला पुरात वाहून गेल्या. यापैकी १ महिला झाडाला अडकल्याने सापडली. दुसरी महिला बेपत्ता झाली होती. सुनीता धुराजी लव्हाळे (वय ४०) असे पुरात वाहून गेलेल्या महिलेचे नाव असून रंजना भास्कर सुरवसे (वय ४२) असे सापडलेल्या महिलेचे नाव आहे.
सध्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने कापूस पेरणीसाठी सरकी लावण्यासाठी त्या शेतात गेल्या होत्या. दुपारी पावणेचारच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या दोन महिला इतरांसह घरी जाताना पुरात वाहून गेल्या होत्या. यापैकी रंजना सुरवसे या एका झाडाला अडकल्याने तब्बल एक तासाने सोबतच्या ग्रामस्थांनी त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.
परंतु, पुरात वाहून गेलेली महिला सुनीता लव्हाळे यांचा शोध ग्रामस्थांसह महसूल प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन टीम घेत होती. तहसीलदार पांडुरंग माचेवाड स्वतः रात्रभर घटनास्थळी ठाण मांडून होते. आज सकाळी ७ वाजता महिलेचा मृतदेह झोडगाव शिवारात काटेरी झुडपात अडकलेल्या अवस्थेत सापडला.
हेही वाचा 

परभणी: मानवत येथे भरधाव कारच्या धडकेत वृद्ध ठार
Parbhani Crime| भयंकर : परभणीत प्रेमविवाह केलेल्या तरुणाचा वडील, भावाकडून खून
परभणी: बळीराजा साखर कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता जमा