दिशादर्शक कमान 10 वर्षांपासून जैसे थे; संभाव्य दुर्घटनेची शक्यता

दिशादर्शक कमान 10 वर्षांपासून जैसे थे; संभाव्य दुर्घटनेची शक्यता

पंचवटी (नाशिक) : गणेश बोडके

घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग पडल्याची घटना घडली होती. तर या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असताना शहरात धोकादायक परिस्थितीत उभ्या असलेल्या दिशादर्शक कमानीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून, याकडे मात्र महापालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट मनपाने नेमून दिलेल्या संस्थेकडून तातडीने करून घेण्यात आले. मात्र, मनपा स्वमालकीच्या कमानींचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्यापही केलेले नसल्याचे आढळून आले आहे. पंचवटीत दिंडोरी नाक्यावर धोकादायक कमान उभी असून, ज्या खांबावर उभ्या राहतात, त्या खांबालाच जोडल्या गेल्या नसल्याचे धक्कादायक चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
होर्डिंग दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सर्वच होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिटसह परवानगी तपासणीचे आदेश दिले. तसेच अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करायचे आदेशदेखील दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच नाशिक महापालिका खडबडून जागी झाली. शहरातील होर्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिटसह पावसाळ्यामुळे वादळ वाऱ्याची शक्यता असल्याने मजबुती व दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचनेच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.
शहरात बाहेरून तसेच परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांना विविध रस्त्यांबाबत माहिती मिळावी याकरिता महापालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी दिशादर्शक कमानी उभारण्यात आले आहे. या दिशादर्शक कमानीच्या एका बाजूला दिशादर्शक, तर दुसऱ्या बाजूला जाहिरातीकरिता जागा देण्यात आली आहे. महापालिकेला उत्पन्न मिळावे यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, या दिशादर्शक कमानीच्या जाहिरात लावण्यासाठी देण्यात आलेल्या जागेवर व्यावसायिक जाहिरातींऐवजी राजकीय व शुभेच्छांच्या जाहिरातींना उत आला असून, यामुळेदेखील एक प्रकारे शहर विद्रुपीकरण होत आहे. शहरात काही दिवसांपासून काही भागांत पावसासह सोसाट्याचा वारा वाहत आहे. यामध्ये शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळली, तर काही ठिकाणी पत्र्याचे शेड उडाल्याच्या घटना घडल्या आहेत.
शहरातील दिशादर्शक कमानींचे काम अपूर्ण अवस्थेत असून, अनेक कमानींना त्याचे उभे असलेले पिलर पूर्णतः जोडलेले नाही. तर अनेक ठिकाणी कमानीची एक बाजू रस्त्याच्या मधोमध हवेत तरंगत आहे. तर त्याला लावण्यात आलेले सिमेंट शिट व फिटिंगसाठी लावलेले स्क्रू कुजल्याने वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळण्याच्या घटना घडत आहे. तर वादळी वाऱ्याने कमानीचा भाग कोसळल्यास अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अपघात होण्याची वाट न बघता धोकादायक दिशादर्शक कमानी हटविणे गरजेचे आहे.
दिंडोरी नाका मृत्यूच्या छायेत
दिंडोरी नाका येथे निमाणी बंगल्यासमोर महापालिकेने २०१४ च्या कुंभमेळ्यात कमान उभारली. परंतु या कमानीचा एक भाग कमानीच्या एका खांबाला जोडण्यात आलेली नाही. गेल्या दहा वर्षांपासून ही कमान अशाच स्थितीत आहे. पाऊस आणि थंडीमुळे ही कमान कुजली असून, ती यंदाच्या पावसाळ्यात केव्हाही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. या कमानीखाली दिंडोरीला जाणाऱ्या जीप प्रवाशांसाठी उभ्या राहतात. तसेच शाळकरी मुलांची सकाळ, दुपारी आणि सायंकाळी गर्दी असते. तसेच कमानीखाली सायंका‌ळी भाजीबाजार भरतो. त्यामुळे तेथे ग्राहक रात्री दहापर्यंत असतात. ही कमान दुर्दैवाने धावत्या वाहनावर कोसळली तर एकाचवेळी किमान पंधरा-वीस जण दगावू शकतात. त्यामु‌ळे सतत दुर्घटनेला आणि मृत्यूला आमंत्रण देणारी ही कमान तातडीने हटविणे गरजेचे आहे.
हेही वाचा:

धक्‍कादायक : चीनमध्ये चार अमेरिकन शिक्षकांवर चाकू हल्ला
‘महालक्ष्मी एक्‍स्‍प्रेस’मध्ये प्रसूती, मुस्‍लिम दाम्‍पत्‍याने मुलीचे नाव ठेवले महालक्ष्मी!