जवानांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक

जवानांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – शहरातील डॉक्टर दाम्पत्याला सैन्य दलातील जवानांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या नावाखाली सव्वा लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डॉक्टर दाम्पत्याने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली आहे.
शहरातील गांधीनगर, जिल्हापेठ येथील डॉ. सुजाता प्रमोद महाजन (६२ ) या महिला डॉक्टर असून त्यांचे खासगी हॉस्पिटल आहे. दि. २० मे रोजी डॉ. सुजाता महाजन यांना एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांना सैन्य दलातील अधिकारी बोलत असून तुमच्याकडे जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी व्हिजिटिंग कार्ड मागविण्यात आले होते.
त्यानुसार डॉक्टरांच्या चालकाने त्यांच्या मोबाईलवरुन व्हिजिटिंग कार्ड पाठवले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर सुजाता महाजन यांचे पती प्रमोद महाजन यांच्याशी अज्ञात व्यक्तीने संपर्क केला. अज्ञात व्यक्तीने ४० ते ५० जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. डॉ. प्रमोद महाजन यांनी पत्नी डॉ. सुजाता महाजन यांचा फोन पे क्रमांक दिला. त्या वेळी संशयित आरोपीने डॉ. सुजाता महाजन यांच्यासोबत संपर्क साधून त्यांच्याकडून फोन पे ची संपूर्ण माहिती घेतली. बोलणे सुरू असतानाच डॉ. महाजन यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होवू लागले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून १ लाख २४ हजार ९९२ रुपये ट्रान्सफर झाले. याप्रकरणी त्यांनी १० जून रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:

Industry World Nashik | मंत्र्यांकडून आश्वासनांची ‘खैरात’; पूर्ण होईल काय पावसाळ्यात?
Aditya-L1 Mission: आदित्य एल-1 चे नवीन यश, सूर्याच्या गतिमान हालचाली टिपल्या