जगातील सर्वात प्राचीन लाकडी कलाकृती

जगातील सर्वात प्राचीन लाकडी कलाकृती

मॉस्को : जगातील सर्वात प्राचीन लाकडी कलाकृती रशियात असून, तिचे नाव ‘शिगीर आयडॉल’ असे आहे. या कलाकृतीमध्ये एक रहस्यमय चेहरा आहे. एके काळी ही कलाकृती सतरा फूट उंचीची होती. लार्च वृक्षाच्या खोडापासून ही कलाकृती बनवलेली आहे. ही कलाकृती सध्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. रशियाच्या उरल पर्वतामध्ये ही कलाकृती सन 1894 मध्ये सापडली होती. ती तब्बल 12,100 वर्षांपूर्वीची आहे.
ज्यावेळी ही कलाकृती बनवली गेली त्यावेळी तिची उंची 17.4 फूट असावी, असे संशोधकांना वाटते. या कलाकृतीवर झिगझॅग पॅटर्नही कोरलेला आहे. तसेच अनेक मानवी चेहरे आणि हातही कोरलेले आहेत. 2.6 दशलक्ष ते 11,700 वर्षांपूर्वीच्या शिकार्‍यांच्या समूहाने ही कलाकृती बनवली असावी, असे संशोधकांना वाटते. या काळाला ‘प्लेस्टोसिन इपोक’ असे म्हटले जाते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘क्वाटर्नरी इंटरनॅशनल’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या कलाकृतीवरील अनेक खुणा या तुर्कीच्या निओलिथिक आर्किओलॉजिकल साईट असलेल्या गोबेकली तेपे येथे सापडलेल्या दगडी कलाकृतीवरही आहेत. शेवटच्या हिमयुगाच्या शेवटी एकाच मानव समूहाने या कलाकृती बनवल्या असाव्यात, असे संशोधकांना वाटते. मात्र, या लाकडी कलाकृतीचे प्रयोजन काय असावे, याचा उलगडा झालेला नाही. कदाचित त्यांच्या काही धार्मिक विधींचा हा भाग असू शकतो.