लग्नानंतर पाचव्या दिवशी दागिन्यांसह दोन नववधू पसार

लग्नानंतर पाचव्या दिवशी दागिन्यांसह दोन नववधू पसार

कुरुंदवाड, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील दोन तरुणांबरोबर लग्न झालेल्या कर्नाटकातील दोन नववधूंनी लग्नाच्या पाचव्या दिवशीच दागिन्यांसह पोबारा केला. हे लग्न जमविण्याच्या नावाखाली एजंटांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. तरुण प्रतिष्ठित कुटुंबातील असून अजून कोणीही पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाही. या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबतची माहिती अशी, कुरुंदवाड व परिसरातील दोन तरुणांनी सोशल मीडियावरील माहितीवरून संबंधित वधू-वर सूचक मंडळाच्या एजंटांशी संपर्क साधला. कर्नाटकातील अंकली-मांजरी येथील एक महिला आणि निपाणी येथील दोन एजंटांच्या या रॅकेटने लग्नासाठी वधू मिळवून देतो असे सांगूून या दोन तरुणांना जाळ्यात ओढले. तरुणींचाही या रॅकेटमध्ये समावेश आहे. हुबळी, धारवाड आणि बागलकोट येथील मुली त्यांना दाखवल्या. मुली पसंत पडल्यानंतर एजंटने हजारो रुपये मानधन घेतले. त्यानंतर तत्काळ विवाह पार पाडला.
नववधू सासरी आल्या. उशिरा का होईना, मुलांचे लग्न झाले म्हणून तरुणांच्या कुटुंबीयांनी आनंदाने नववधूंना सोन्याचे दागिने घातले. विवाहाला पाच दिवस झाल्यानंतर दोन्ही नववधू कर्नाटकातील माहेरी गेल्या. काही दिवसांनी त्यांना परत आणण्यासाठी तरुणांचे नातेवाईक लवाजम्यासह गेले असता त्या मुली कुटुंबासह घर सोडून अन्यत्र राहण्यास गेल्याचे समजले. त्या कुठे गेल्या माहिती नाही. त्या तीन महिन्यांपूर्वीच याठिकाणी वास्तव्यास आल्याचे शेजार्‍यांनी सांगितले. तरुणींनी दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला तर संपर्क झाला नाही. एजंटांशी संपर्क न झाल्याने फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. अधिक चौकशी करता लग्नाच्या आमिषाने तरुणांना फसविणारे हे रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा शोध सुरू असून पोलिसांत मात्र तक्रार दिलेली नाही.
नवा पती..नवे घर.. नवे गाव..!
कुरुंदवाड येथील दोन युवकांना 2022 साली अशाच एका रॅकेटने फसवले होते. लग्न लावून देऊन पाच दिवसांनी वधूने सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा केला होता. पोलिसांनी एजंट, तरुणीसह नऊजणांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याचीच पुनरावृत्ती झाली आहे. लग्न जुळेपर्यंत एका घरात वास्तव्य करायचे आणि विवाहानंतर लगेच गाव, ठिकाण बदलून गायब होतात, असा त्यांचा धंदाच असल्याची चर्चा आहे.