भारताचे पाकिस्तानला 120 धावांचे आव्हान

भारताचे पाकिस्तानला 120 धावांचे आव्हान

Bharat Live News Media वृत्तसेवा : अमेरिकेविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करणार्‍या पाकिस्तानकडून ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध चांगल्या कामगिरीची कोणालाच अपेक्षा नव्हती. पण, त्यांच्या गोलंदाजांनी सर्वांना अनपेक्षित धक्का दिला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा बाबर आजमचा निर्णय त्यांनी सार्थ ठरवला. भारताकडून ऋषभ पंत सोडून सर्वांनी नांग्या टाकल्या. पावसामुळे नाणेफेक उशिरा झाली. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही पाउस आला. पावसाळी वातावरण आणि समोर पाकिस्तानचा वेगवान मारा यामुळे भारतीय फलंदाजीची कसोटी लागणार होती. रोहित शर्माने पहिल्या षटकात षटकार खेचून भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
पहिले षटक पूर्ण झाल्यानंतर पाऊस सुरू झाला आणि सर्व खेळाडूंना पुन्हा डगआऊटमध्ये जावे लागले. 9.15 वाजता पाऊसाने विश्रांती घेतली. पावसानंतर खेळ सुरु झाला, पण विराट कोहलीचा अपयशाचा पाढा सलग दुसर्‍या सामन्यात कायम राहिला आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात विराट (4) प्रथमच सलग दोन सामन्यांत एकेरी धावेवर माघारी परतला. त्यापाठोपाठ शाहीन आफ्रिदीने सापळा रचून तशाच चेंडूवर रोहितला झेलबाद केले. रोहितने 13 धावा केल्या. भारताचे दोन्ही सलामीवीर 2.4 षटकांत 19 धावांवर माघारी परतले.
चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलने (20) दम दाखवला आणि ऋषभसह 39 धावा जोडल्या. नसीमने त्याला बाद केले. हा दिवस ऋषभचा होता आणि त्याचे 3 झेल सुटले. त्याचा फायदा उचलताना त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना चोप दिला.
ऋषभने 10व्या षटकात हॅरिस रौफला सलग तीन चौकार खेचून संघाला 3 बाद 81 धावांपर्यंत पोहोचवले. ऋषभला रोखणे पाकिस्तानसाठी अवघड होऊन बसले, कारण तो त्याचे आडवेतिडवे शॉट्स अगदी सहजतेने खेळून धावांचा पाऊस पाडत होता. पण, सूर्यकुमार यादव (7) रौफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शिवम दुबेला (3) फलंदाजीची संधी मिळाली, परंतु नसीम शाहने संथ चेंडूवर त्याला कॉट अँड बोल्ड केले. मोहम्मद आमीरने 15व्या षटकातच भारतीयांना हादरवून सोडले. आमीरच्या गोलंदाजीवर ऋषभने आक्रमक फटका खेचला, परंतु यावेळी त्याचा झेल गेला. ऋषभ 31 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 42 धावांवर माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर रवींद्र जडेजा शॉर्ट मिड ऑफला इमाद वासीमला सोपा झेल देऊ परतला.
भारताची अवस्था 7 बाद 97 अशी झाली होती. अर्शदिपने आमीरची हॅटट्रिक रोखली. नसीम शाहने 4-0-21-3 असा अप्रतिम स्पेल टाकला. हार्दिक पंड्याकडून (7) अखेरच्या षटकांत खूप अपेक्षा होत्या, परंतु इफ्तिखर अहमदने भन्नाट झेल घेतला. हॅरिस रौफने सलग दुसर्‍या चेंडूवर जसप्रीत बुमराहला भोपळ्यावर माघारी पाठवले. अर्शदिप (9) शेवटी धावचित झाला. भारत 19 षटकांत 119 धावांवर ऑल आऊट झाला. रौफने 21 धावांत 3 विकेट्स घेतल्या.