पैठण, Bharat Live News Media वृत्तसेवा: जादा व्याजदराचे आमिष दाखवून ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्हच्या पैठण शाखा अंतर्गत ५० हून अधिक खातेदारांची ३ कोटी ६९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिरूमला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे त्यांची पत्नी अर्चना कुटे यांच्यासह ३ जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात आज (दि.९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पैठण शहरातील मेनरोड वर काही वर्षांपूर्वी बीड येथील तिरूमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे यांनी मोठा गाजावाजा करून अनुराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह शाखेचा शुभारंभ केला. शाखेमध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर व्याज देण्याचे आमिष दाखवून गोरगरीब कष्टकरीसह छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमा करून घेतली.परंतु, काही खातेदारांनी मागील चार महिन्यांपासून पैसे परत घेण्यासाठी शाखेचे उंबरठे अनेक वेळा झिजविले. या बँकेच्या शाखेत पैसे परत मिळण्याची आशा मावळल्यामुळे फसवणूक झालेल्या खातेदारांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे तक्रार दाखल केली. खातेदार कापड व्यापारी मुकेश श्रीचंद पंजवाणी (रा. माधवनगर, पैठण) यांचा जवाब नोंदविण्यात आला.
३ कोटी ६९ लाख ८० हजार ५९८ हजारांची ठेवी
२०१५ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ३ कोटी ६९ लाख ८० हजार ५९८ हजारांची ठेवींची मुदत पूर्ण झालेल्या ठेवीदारांनी शाखेत जाऊन ठेवी परत मागितल्या. परंतु त्यांना दाद दिली नाही. त्यानंतर त्यांनी संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे, पत्नी बिझनेस प्रमोटर अर्चना सुरेश कुटे, मॅनेजर पवळ, रिजनल हेड लाखे, बँच मॅनेजर वैजनाथ डाके (रा. बीड) यांच्याकडे वारंवार जाऊन तगादा लावला.
३० खातेदारांची पोलीस ठाण्यात तक्रार
सध्या पैठण शाखेतील व्यवहार बंद झाल्याने आपले फसवणूक झाल्याचे जवळपास ३० खातेदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट पैठण शाखेमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या तक्रारदारांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
हेही वाचा
छ.संभाजीनगर: रांजणगाव येथे बोगस कापूस बियाणे विक्रीचा पर्दाफाश; एकाला अटक
छ.संभाजीनगर: सासूरवाडीला जाताना भीषण अपघात; दोन साडूंचा जागीच मृत्यू
छ.संभाजीनगर : भाजप पदाधिकाऱ्याच्या वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर