विदर्भात महाविकास आघाडीची बाजी: विधानसभेसाठी इच्छुकांच्या हालचाली

विदर्भात महाविकास आघाडीची बाजी: विधानसभेसाठी इच्छुकांच्या हालचाली

राजेंद्र उट्टलवार
नागपूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. मोदी सरकार सत्तेवर येत असताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भातील 42 विधानसभा मतदारसंघात महायुतीवर महाविकास आघाडीने बाजी मारल्याने आगामी निवडणुकीत तिकिटासाठी कोण बाजी मारणार याची गणिते सुरू झाली आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघात एकीकडे भाजप शिवसेनेत सुरुवातीला उमेदवारीवरून तर आता झालेल्या पराभवावरून परस्पर विरोधात आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच आता रामटेक विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतही वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे विजयी उमेदवार श्यामकुमार बर्वे यांचा विजय काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्यासाठी ‘बूस्टर ‘ठरणार असून भाजप शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे अशी सर्व यंत्रणा एकत्रित असताना केदार यांना पूर्वी सावनेर विधानसभा आणि आता रामटेक लोकसभेत रोखण्यात महायुतीला अपयश आले. सावनेर, हिंगणा, काटोल कामठी अशा लक्षवेधी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने मारलेली मुसंडी ही भविष्यातील निवडणुकांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यातून यावेळी निसटल्यानंतर आता पुढील वेळी भाजप या मतदारसंघावर दावा ठोकण्याची चिन्हे असल्याचे बोलले जाते.
तर दुसरीकडे रामटेक विधानसभा मतदारसंघ सध्या शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार आशीष जैस्वाल यांच्याकडे आहे. याहीवेळी ते अपक्ष लढण्याच्या पवित्र्यात आहेत. माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह इतरही अनेक जण इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि यावेळी बर्वे यांच्या विजयात मोलाचा वाटा असलेले माजी मंत्री राजेंद्र मुळक इच्छुक आहेत. बर्वे यांच्या विजयानंतर झालेल्या आभार सभेत माजी जि. प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी थेट मुळक हे रामटेक विधानसभेचे पुढचे उमेदवार असल्याची घोषणा करून टाकली. यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याची चिन्हे आहेत.
आघाडीत कुठलीही चर्चा नसताना आणि रामटेक हा शिवसेनेचा परंपरागत मतदार संघ असताना काँग्रेसने दावा करू नये, चर्चेशिवाय परस्पर घोषणा करू नये, अशी भूमिका शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रेम रोडेकर यांनी घेतली असून हा विषय वरिष्ठांच्या कानी घातला आहे. स्वतः मुळक यांनीही यासंदर्भात कुठलीच वाच्यता न केल्याने त्यांची ही मूकसंमती असल्याचे उघड झाले. आता माजी मंत्री सुनील केदार या संदर्भात कुठली भूमिका घेणार यावर पुढील रणनीती ठरणार असली तरी महाविकास आघाडीत रामटेक विधानसभेवरून शीतयुद्ध सुरू झाले आहे.
कधी काळी शिवसेना ठाकरे गटाकडे रामटेक लोकसभा मतदारसंघ होता.  नंतर तो शिवसेना शिंदे गटाकडे केला. आता तो काँग्रेसने ताब्यात घेतला पुढील लोकसभा निवडणुकीत कदाचित भाजप या मतदारसंघात तिकिटाचा प्रबळ दावेदार असणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसला मिळालेली आघाडी भाजपसाठी विद्यमान आमदार समीर मेघे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.
माजी मंत्री सुनील केदार यांनी पहिली आभार सभा हिंगण्यात घेतली. यावेळी आपण मेघे यांनी दिलेले आव्हान स्वीकारले असून हिंगणा मतदारसंघात आगामी निवडणुकीत चमत्कार घडवून दाखवू, असा निर्धार व्यक्त केला आहे. ते स्वतः लढतात की माजी मंत्री रमेश बंग, विजय घोडमारे यांना शक्ती देतात, हे महत्वाचे आहे. अर्थातच केदार यांची वाढलेली शक्ती नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला पाठबळ देणारी आणि भाजपला धोबीपछाड देणारी ठरणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा 

Shobha Bachhav | गळ्यात कांद्याची माळ घालून माहेरी शोभा बच्छाव यांचे जंगी स्वागत
RSS सोबत नागपूरमध्ये २ तासांची बैठक, देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना कोणता सल्ला दिला?
नागपूर : निवडणुकीत पराभूत उमेदवारांना करता येणार फेर मतमोजणी