महिलेच्या शरीरातून काढली डुकराची किडनी

महिलेच्या शरीरातून काढली डुकराची किडनी

वॉशिंग्टन : अवयव प्रत्यारोपण ही आता एक महत्त्वाची गरज बनलेली आहे. मात्र, त्यासाठी अनेक वेळा दाते मिळत नसल्याने रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी तिष्ठत राहावे लागते. त्यावर उपाय म्हणून सध्या जनुकीय सुधारणा केलेले डुकरातील अवयव वापरले जात आहेत. 12 एप्रिल रोजी अमेरिकेतील एका महिलेमध्ये जनुकीय सुधारित डुकराची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. आता तब्बल 47 दिवसांनी डॉक्टरांनी महिलेच्या शरीरातून ट्रान्सप्लांट केलेली किडनी काढली आहे.
न्यूयॉर्कमधील लँगोन ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी न्यूज वेबसाईट न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, रुग्णाच्या हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांची नवीन किडनी खराब झाली होती. या कारणास्तव ती काढण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांच्या मते, लिसाची प्रकृती अजूनही सामान्य आहे. वास्तविक, डुकराची किडनी लिसाच्या शरीरात ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी 4 एप्रिल रोजी तिच्यावर यांत्रिक हृदय पंप बसवण्यात आला होता. यांत्रिक हृदय पंपाने मानवामध्ये अवयव ट्रान्सप्लांटची ही पहिलीच घटना होती.
मेकॅनिकल हार्ट पंप डिव्हाईस (एलव्हीएडी) योग्य पद्धतीने रक्तपुरवठा करू शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते म्हणाले की, ट्रान्सप्लांटनंतर मूत्रपिंड शरीरात चांगले कार्य करत आहे आणि नाकारण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. मात्र, किडनी काढल्यानंतर लिसाचे यांत्रिक हृदय पंप व्यवस्थित काम करत आहे. लिसाच्या आधी, मार्चमध्ये, 62 वर्षीय रिचर्ड रिक स्लेमन यांना अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये डुकराची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली होती. पण, अवघ्या 2 महिन्यांनी रिचर्डचा मृत्यू झाला.
त्यानंतर किडनी प्रत्यारोपणानंतर डॉक्टरांनी दावा केला होता की, या जनुकीय सुधारित डुकराची किडनी किमान 2 वर्षे काम करेल. मात्र, त्यानंतर डॉक्टरांनी रिक स्लेमनचा मृत्यू किडनी निकामी झाल्यामुळे झाला नसल्याचा दावा केला. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाला आणखी काही गंभीर आजार आहेत. रिचर्ड स्लीमनच्या आधी डुकराची किडनी ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली होती.