चार हजार वर्षांपूर्वीच्या शैलचित्रात ‘सहारा’चे हिरवे रूप

चार हजार वर्षांपूर्वीच्या शैलचित्रात ‘सहारा’चे हिरवे रूप

सिडनी : जगातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून आफ्रिकेतील सहाराची ख्याती आहे. आता तिथेच एका मोठ्या शिळेवर तब्बल चार हजार वर्षांपूर्वीचे चित्र आढळले आहे. या चित्रामध्ये सहारा वाळवंटाचे एके काळी असलेले हिरवे रूपही दिसून येते. या शैलचित्रात त्यावेळेच्या माणसांनी चक्क नौका आणि जनावरांचेही चित्रण केलेले आहे. एके काळी सहारा वाळवंटाचा परिसरही हिरवागार होता. मात्र, हवामान बदलानंतर सध्याचे वाळवंट निर्माण झाले. तत्पूर्वीचा सहाराचा हिरवा भूतकाळ या शैलचित्रामधून दिसून येतो.
ईस्टर्न डेझर्ट किंवा ‘अतबाई’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी मध्यभागात ऑस्ट्रेलियन संशोधकांनी सोळा नवे रॉक साईटस् शोधले आहेत, जिथे ही चित्रे आढळली. हे ठिकाण सध्या वाळवंटी आणि निर्जन बनलेले आहे. तिथे ही हजारो वर्षांपूर्वीची सुंदर चित्रे पाहून संशोधक थक्क झाले. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘द जर्नल ऑफ इजिप्शियन आर्कियोलॉजी’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे ठिकाण दोन कारणांसाठी आश्चर्यकारक आहे. पहिले म्हणजे ज्याठिकाणी हे स्थळ आहे, ते सर्वात जवळचे पाणथळ ठिकाण किंवा लेक नुबिया या तलावापासूनही बर्‍याच अंतरावर आहे.
या तलावापासूनचे चित्रे असलेल्या ठिकाणाचे अंतर तब्बल 97 किलोमीटरचे आहे. दुसरे म्हणजे सध्या हे ठिकाण जनावरे चारण्यासारखे राहिलेले नाही. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील मॅकक्युरी युनिव्हर्सिटीमधील संशोधक ज्युलियन कुपर यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, हे कॅटल रॉक आर्ट अतिशय महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण आहे. सध्याचे हे ठिकाण पाहता अशा रखरखीत वाळवंटात ही जनावरे राहणे शक्यच नाही. मात्र, ज्या काळात ही चित्रे बनवण्यात आली, त्या काळात इथे तशी स्थिती होती व येथील लोक जनावरे पाळतही होते.
एका चित्रात एक गाय व ती राखणारा एक माणूस दिसून येतो. त्यावरून असे दिसते की, हे ठिकाण एकेकाळी राहण्या योग्य व हिरव्या गवतांचे कुरण असलेले होते. या प्रदेशात हवामान बदल घडून आला, हे स्पष्टच दिसते. पाच हजार वर्षांपूर्वीच्या काळात सहारा अधिक ओला, हिरवागार होता. सध्याच्या काळात याठिकाणी केवळ उंट आणि बकर्‍याच राहू शकतात. याठिकाणी काही नौकांची चित्रेही आहेत. ती कदाचित नाईल नदीमधून याठिकाणी आलेल्या लोकांशी संबंधित असतील, असेही त्यांनी म्हटले आहे.