मावळात ‘महायुती’च्या बारणेंची हॅट्ट्रिक!

मावळात ‘महायुती’च्या बारणेंची हॅट्ट्रिक!

मिलिंद कांबळे, गणेश विनोदे, दीपेश सुराणा

पिंपरी : शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा पराभव करून शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात हॅट्ट्रिक केली. गतवेळी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा दोन लाख मतांनी दणदणीत पराभव करणार्‍या बारणेंना या वेळी सुमारे 96 हजारांच्या मताधिक्यावरच समाधान मानवे लागले आहे.
चिंचवडची साथ मिळाल्याने बारणेंचा विजय सुकर
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात चिंचवड विधानसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना नेहमीप्रमाणे भरभरून साथ दिली. तब्बल 1 लाख 86 हजार 235 मते मिळाल्याने तब्बल 74 हजार 765 मताधिक्याने बारणेंचा विजय अधिक सुकर झाला. त्यावरून चिंचवड मतदारसंघ महायुतीसोबतच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्याचे फलित म्हणून काही महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे तिकीट जवळजवळ ‘फिक्स’असल्याचे बोलले जात आहे. तसेच, आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेत महायुतीला मोठे यश मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
चिंचवडमध्ये अखेरपर्यंत आघाडी कायम
चिंचवड विधानसभेत 6 लाख 18 हजार 145 पैकी 3 लाख 22 हजार 700 मतदान झाले. हे प्रमाण 52.20 टक्के आहे. त्यापैकी 1 लाख 86 हजार 235 मते एकट्या श्रीरंग बारणे यांच्या पारड्यात पडली आहेत. सर्व 26 फेर्‍यांमध्ये बारणे हे चिंचवडमधून मताधिक्य घेऊन आघाडीवर होते. अखेरपर्यंत ही आघाडी कायम होती. बारणेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांना चिंचवडमधून 1 लाख 11 हजार 470 मते मिळाली. मतांची ही संख्या लक्षणीय आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीनेही जोर लावल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे. तर, 24 हजार 995 मते उर्वरित 31 उमेदवारांसह नोटाला विभागली गेली आहेत.
मतदानाच्या आकडेवारीवरून चिंचवड विधानसभेत भाजपासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आरपीआयच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी महायुतीचा धर्म पाळल्याचे स्पष्ट होते. आगामी विधानसभा तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक आणि माजी नगरसेवकांनी या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढीसाठी प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाले. प्रभागनिहाय बैठकांवर भाजपाने अधिक भर दिला.
मावळात वाघेरेंच्या ‘मशाल’ने लावला महायुतीला ‘सुरुंग’
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये अवघ्या 4 हजार 935 मतांची आघाडी मिळाली असल्याने संजोग वाघेरे यांच्या मशालीने मावळात ‘सुरुंग’ लावल्याचे स्पष्ट दिसत आहे. बारणेंचा विजय झाला असला तरी आजी-माजी आमदार एकत्र असतानाही मावळ विधानसभा मतदासंघात मशाल कशी पेटली याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मनोमीलन तरीही पेटली मशाल

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेली चार वर्षे एकमेकांच्याविरोधात संघर्ष करणारे माजी राज्यमंत्री संजय भेगडे व आमदार सुनील शेळके यांच्यासह तालुक्यातील भाजप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनोमिलन झाले व महायुतीचे उमेदवार बारणे यांना विजयी करण्यासाठी सर्वांनीच चंग बांधला होता. गावपातळीपासून आमदारकीपर्यंत होणार्‍या सर्वच निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढणारे या निमित्ताने एकत्र आलेले पहावयास मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने मशाल पेटली नाही

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मात्र दोन महिन्यांपासून मावळ तालुक्यातील गावोगावी, घरोघरी संपर्क साधून नात्यागोत्याला जागे करत मशाल पेटवली होती; परंतु तालुक्यात प्रमुख पक्ष असलेले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आल्याने मशाल पेटणार नाही, अशी शक्यता वाटत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातील इतर विधानसभा मतदासंघांच्या मानाने मावळ विधानसभा मतदारसंघात मशाल पेटल्याचे स्पष्ट दिसत आहे.
निवडणूक प्रचार काळात बाळा भेगडे व सुनील शेळके यांनी ‘सुरुंग’ लावण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत तसेच यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत ‘दैनिक Bharat Live News Media’ने मावळात नेमका कोण कोणाला सुरुंग लावणार की दोघे मिळून विरोधकांना सुरुंग लावणार, याबाबत विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. प्रत्यक्षात मात्र बारणे यांना मिळालेले मतदान व वाघेरे यांना मिळालेले मतदान पाहिले तर मावळात वाघेरेंच्या मशालीनेच महायुतीला सुरुंग लावला असल्याचे दिसतेय. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शेळके यांना 1 लाख 67 हजार 712 तर बाळा भेगडे यांना 73 हजार 770 मते मिळाली होती. या लोकसभा निवडणुकीत झालेल्या 2 लाख 6 हजार मतदानापैकी बारणे यांना सुमारे 94 हजार 800 इतकेच मतदान झाल्याने नेमके कोणी काम केले, कोणी केले नाही असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

ग्रामीण भागात पेटली मशाल; शहरी भागात सुटला बाण

मावळ विधानसभा मतदासंघात प्रामुख्याने ग्रामीण भागात मतदारांनी संजोग वाघेरे यांनाच पसंती दिल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसत आहे, तर शहरी भागात म्हणजे तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, देहूरोड, लोणावळा या शहरांमध्ये श्रीरंग बारणे यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे कमी का होईना, पण मावळ विधानसभा मतदारसंघात बारणे यांना मताधिक्य मिळाले.
पिंपरीत कमी मताधिक्यावर मानावे लागले समाधान
मावळ लोकसभाअंतर्गत मतदारसंख्येनुसार तिसर्‍या क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना 16 हजार 731 मतांनीच महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्याविरुद्ध आघाडी घेता आली आहे. या मतदारसंघात वाघेरे यांना चांगली मते मिळाली. त्यांना नात्यागोत्याचे राजकारण, गावकी-भावकीचा येथे फायदा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उतरले असले तरीही काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात उडी घेतली. त्यामुळेही मताधिक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही उमेदवारांनी आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पिंपरी विधानसभा मतदारसंघात दोघांपैकी कोणता उमेदवार मतांची गोळाबेरीज करण्यात यशस्वी ठरतो त्यावर बर्‍याच अंशी विजयाचे गणित अवलंबून होते. त्यामध्ये बारणे यशस्वी ठरले. वाघेरे हे पिंपरीगावात स्थायिक आहेत. त्यांची येथे नातीगोती आहेत. तसेच, गावकी-भावकीच्या राजकारणाचाही त्यांना फायदा झाला. त्यामुळे या मतदारसंघामध्ये त्यांना 76 हजार 592 इतकी मते मिळविता आली. तर, बारणे यांना 93 हजार 323 मते मिळाली.
महायुतीमध्ये सुरुवातीला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मावळच्या जागेसाठी दावा करण्यात आला होता. मात्र, ही जागा शिवसेनेसाठी सोडण्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी बारणे यांच्या प्रचारात सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अण्णा बनसोडे हे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारासाठी उतरल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे आदेश दिल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्तेही प्रचारात उतरले.

विकासकामांचा मुद्दा ठरला निर्णायक

विकासकामांच्या मुद्द्यावर पिंपरी विधानसभेत निवडणूक प्रचारावर भर देण्यात आला. त्यासाठी बैठका, मेळावे, सभा यांचे नियोजन करण्यात आले. गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे हा मुद्दा महायुतीकडून उचलण्यात आला. तर, न झालेल्या कामांचा मुद्दा महाविकास आघाडीने उचलुन धरला. त्यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्याचप्रमाणे, फेसबुक, व्हॉट्सअप आदी सोशल मिडियाच्या माध्यमातूनही प्रचार करण्यात आला. त्याचबरोबरच व्हॉइस कॉल, मेसेज आदींचाही उपयोग मतदारापर्यंत पोहचण्यासाठी करण्यात आला.

मतांच्या गणितावर आगामी रणनीती

मावळ लोकसभेच्या मतमोजणीनंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघातुन जरी श्रीरंग बारणे यांना कमी मताधिक्य मिळाले असले तरीही येथील मतदारांनी दिलेल्या मतांचाही त्यांच्या यशात मोठा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. या मतदारसंघातील मतांची टक्केवारी तसेच महायुती आणि महाविकास आघाडीला मिळणारी मते यांच्या गणितावर पिंपरी विधानसभा निवडणुकीची आगामी रणनीती ठरणार आहे. मताधिक्य कोठे मिळाले, कोठे कमी पडले याचा आलेख त्यासाठी तपासला जाणार, हे मात्र निश्चित आहे.
हेही वाचा 

अजित पवारांचा पुतण्या युगेंद्रला झटका; बारामती कुस्तीगीर संघावरून हटविण्याच्या हालचाली
तुतारीने विद्यमान आमदारांची झोप उडवली; आढळराव पाटील यांच्या पराभवाने राष्ट्रवादी घायाळ
लोकसभा विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधींची होणार निवड