परभणी: मानवतला ग्रामविकास अधिकारी १० हजारांची लाच घेताना जाळ्यात
मानवत: Bharat Live News Media वृत्तसेवा: जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून मंजूर झालेल्या रकमेतून केलेल्या नाली व सिमेंट रोडच्या कामाचे धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी असलेल्या फॉर्मवर सही व शिक्का देण्यासाठी १० हजारांची लाच घेताना तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामविकास अधिकारी मधुकर बाबुराव गोरे (वय ५२) यास परभणीच्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. ५) रंगेहाथ पकडले.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मौजे पोहंडूळ येथे गावातील गुत्तेदार यांनी डीपीडीसी च्या निधी मधून मंजूर झालेल्या रकमेतून तेथील नाली व सिमेंट रोड तयार करण्याचे काम केलेले होते. तक्रारदार यांनी वरीलप्रमाणे केलेल्या कामाचे धनादेश मिळविण्यासाठी मधुकर गोरे यांची भेट घेवून धनादेश घेतला. त्यानंतर सदर धनादेश तक्रारदार यांचे बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या आरटीजीएस फॉर्मवर मधुकर गोरे यांची सही व शिक्का आवश्यक असल्याने सदरचे सही व शिक्का देण्यासाठी मधुकर गोरे यांनी तक्रारदार यांना २० हजारांची लाच मागितली.
ही लाचेची रक्कम न दिल्यास मधुकर गोरे हे RTGS फॉर्मवर सही व शिक्का देणार नाही. या भीतीने तक्रारदार यांनी त्यांच्याकडे असलेले ४ हजार रूपये मधुकर गोरे यांना लागलीच दिले. त्यानंतर उर्वरित १६ हजार रूपये RTGS फॉर्म वर सही व शिक्का घ्यायचे वेळी आणून देण्यास सांगितले. सदर रक्कम ही लाच असल्याने व तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी १३ मे रोजी परभणीच्या लाचलुचपत कार्यालयात तक्रार दिली.
त्यानंतर पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना मिळालेला धनादेश त्यांचे बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या RTGS फॉर्मवर मधुकर गोरे यांनी सही व शिक्का देण्यासाठी तडजोडी अंती १० हजार रूपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून लाचलुचपत विभागाने बुधवारी (दि. ५) पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान गोरे यांनी तक्रारदार यांच्कयाडून १० हजार रुपये लाच रक्कम घेताना पोहनडुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत परभणीचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे व त्यांच्या पथकाने केली.
हेही वाचा
Lok sabha Election 2024 Results : परभणीचे ‘बॉस’ संजय जाधवच; परभणीकर ठाकरेंच्या पाठीशी ठाम…
परभणी: ७ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचे उपअधीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
परभणी: हादगाव येथे दुचाकी-कारची धडक; एक ठार, अपघातग्रस्त कार पेटवली