मुरलीधर मोहोळ यांना शिवाजीनगरमधून काठावरचे मताधिक्य

मुरलीधर मोहोळ यांना शिवाजीनगरमधून काठावरचे मताधिक्य

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसला मताधिक्याची मोठी अपेक्षा असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना 3 हजार 800 मतांचे मताधिक्य मिळाले. भाजपचे विद्यमान आमदार असतानाही मोहोळ यांना काठावरचे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 78 हजार 530 इतकी मतदानसंख्या आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत सर्वाधिक कमी 50.67 टक्के म्हणजेच 1 लाख 41 हजार 113 इतक्या मतदानाची नोंद झाली होती. पुणे लोकसभा मतदारसंघात येणार्‍या सहा मतदारसंघातील या मतदारसंघात शिवाजीनगर, गोखलेनगर, वडारवाडी, खडकी कॅन्टोमेन्ट बोर्ड, बोपोडी या झोपडपट्टी आणि वस्तीभाग आहे. हा सर्व भाग काँग्रेसला मानणारा आहे.
तर औंध, भोसलेनगर, मॉडर्न कॉलनी, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, प्रभात रस्ता हा उच्चभ्रू सोसायटीचा भाग भाजपला मानणारा आहे. गत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला 29 हजार 532 मताधिक्य मिळाले होते. तर विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार सिध्दार्थ शिरोळे हे जेमतेम पाच हजारांच्या मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात किमान 15 ते 20 हजारांचे मताधिक्य मिळाले असा काँग्रेसचा अंदाज होता. तर पक्षाचा आमदार असल्याने किमान 15 ते 20 हजारांचे मताधिक्य घेण्याचे भाजपचे प्रयत्न होते. प्रत्यक्षात याठिकाणी मोहोळ यांना 3 हजार 800 मतांचे मताधिक्य घेतले. त्यामुळे काँग्रेसची मोठी निराशा झाली तर
अपेक्षित मोठे मताधिक्य न देऊ शकल्याने भाजपच्या गोटातही नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, मताधिक्य मिळाले असले तरी या निकालाने शिवाजीनगरमध्ये भाजपासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. आमदार शिरोळे यांनी गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात विकासकामे आणि जनसंपर्काच्या माध्यमातून हा मतदारसंघ भाजपसाठी भक्कम स्थितीत आणण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, या मताधिक्याने ते काही प्रमाणात फोल ठरले आहे. तर मताधिक्य मिळाले नसले तरी आगामी विधानसभा मतदारसंघात याठिकाणी विजयी मिळविण्यासाठी काँग्रेसचा उत्साह वाढविणारा ठरणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पुणेकरांनी चांगल्या मतांनी मुरलीधर मोहोळ यांना निवडून दिले आहे, त्याबद्दल सर्व पुणेकरांचा मी आभारी आहे. एकंदरीत हा निकाल आम्हाला अपेक्षित होता. त्या पद्धतीने कौल आला आहे, याबद्दल भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून आनंद तसेच समाधान आहे. येत्या काळात मोदींच्या नेतृत्वात जी कामे चालू आहेत, ती गतीने पूर्ण करण्याकडे आमचा प्रयत्न राहील. तसेच, मोदींच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास करून पुण्याला नवी ओळख देण्याचा प्रयत्न आगामी काळात करण्यात येईल.
– सिद्धार्थ शिरोळे, आमदार, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ, भारतीय जनता पक्ष

हेही वाचा

Nashik | शिरसगाव शिवार परिसरात विमान कोसळल्याने शेतकऱ्यांचे झाले नुकसान
पर्वतीमध्ये भाजपच्या मताधिक्यात घट; धंगेकरांनी आंदोलन होते चर्चेत
Lok Sabha Election 2024 Results : पश्चिम महाराष्ट्र, कोकणात युती-आघाडी समसमान