दोन महिन्यांनी गावात आला टॅंकर, महिलांची उडाली झुंबड

दोन महिन्यांनी गावात आला टॅंकर, महिलांची उडाली झुंबड

इगतपुरी(जि. नाशिक):Bharat Live News Media वृत्तसेवा- नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी तालुक्यातील खैरगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिदवाडीत शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. जवळपास ८०० लोकवस्ती असलेल्या शिदवाडी येथील ग्रामस्थांना व लहान चिमुरड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करत भटकंती करावी लागत आहे.
दोन महिन्यानंतर विहिरीत पाणी टाकल्यानंतर पाणी भरण्यासाठी झालेली महिलांची गर्दी
चार महिन्यात फक्त तीन टॅंकर

चार महिन्यात येथे असलेल्या विहिरीत फक्त तीन पाण्याचे टँकर पंचायत समितीच्या वतीने टाकण्यात आले.
टँकर टाकलेल्या विहिरीचे पाणी दोन दिवसच पुरते.
यानंतर येथील नागरिकांना दोन किलोमीटर पायपीट करून शेणवडच्या बंधाऱ्यावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे.
विशेष म्हणजे खेळण्या बागडण्याच्या वयात लहान लहान मुलींना डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

जिल्हापरिषदेवर काढणार हंडा मोर्चा
याबाबत येथील आदिवासी नागरिकांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांना या भीषण पाणी टंचाईची कहानी कथन केल्यानंतर लकी जाधव यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता पाण्याचे भीषण वास्तव समोर आले. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासींवर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. यावेळी जाधव यांनी या सर्व प्रकाराला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल जबाबदार असून जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार असल्याचा इशारा दिला आहे.
दोषींवर कारवाईची करणार मागणी 
तसेच तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांचे सुद्धा येथे तीन तेरा वाजले असून अजून काम पुर्ण झाल्याचा कुठेही पत्ता दिसत नाही. जलजीवन योजना फक्त कागदावरच दिसत असून या योजनेचा निधी अधिकारी व ठेकेदारांनी परस्पर लाटल्याचे दिसून येत आहे. याबाबत आपण पावसाळी अधिवेशनात जलजीवन मिशन योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती लकी जाधव यांनी दिली.
हेही वाचा –

Eknath Khadse | राज्यातील फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचले नाही
हार्दिक पांड्या-नताशाचे भांडण संपुष्टात? सोशल मीडियावर कपल फोटो पुन्हा दिसले
कोल्हापूर : पेठवडगावात आढळले दुर्मिळ स्थलांतरीत पेंटेड लेडी फुलपाखरू