‘एमएनजीएल’च्या रस्ते खोदकामामुळे शासन निधीचा अपव्यय; दोषींवर कारवाईची गरज

‘एमएनजीएल’च्या रस्ते खोदकामामुळे शासन निधीचा अपव्यय; दोषींवर कारवाईची गरज

तळेगाव दाभाडे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शासनाकडून सुमारे 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध कॉलनीमधील 32 अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि मजबुतीकरणाचे दोन महिन्यांपूर्वी केलेले काम खासगी कंपन्यांच्या पाइपलाइन, केबलसाठी खड्डे घेतल्याने उखडून टाकले जात आहे.
आ. शेळके यांची जिल्हाधिकार्‍यांकडे चौकशीची मागणी
शासनाच्या निधीला वाया घालवण्यार्‍या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या पाईपलाईनसाठी ठिकठिकाणी केलेल्या खोदकामांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीकडून शहरात पाईपलाईन टाकण्याकामी केलेल्या खोदाईमुळे होणार्‍या रस्ते दुरुस्तीसाठी केवळ सात कोटी 17 लाख 68 हजार रुपये नगर परिषदेत भरण्यात आले आहेत. वास्तवात यापेक्षा जास्त नुकसान होणार असल्याचे प्रशासनाला माहित असूनही इतकी कमी रक्कम कशी स्वीकारण्यात आली.
कागदावर दाखवलेले काम आणि प्रत्यक्ष होणारी खोदाई याचे मूल्यमापन चौकशीतून समोर येणे गरजेचे असल्याचे आमदार शेळके यांनी दैनिक Bharat Live News Media प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की खोदकाम करण्यात आलेले सदर रस्ते अत्यंत सुस्थितीत असून महाराष्ट्र सुवर्ण जयंती महानगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्यांची सुधारणा मार्च एप्रिल महिन्यात केली आहे. परंतु सदर खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून, शासननिधीचा मोठा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांच्याही अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.
आचारसंहिताकाळात मंजुरी दिल्याची शक्यता
विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितेच्या काळात रस्ते खोदण्याची परवानगी दिली गेली आहे, ती कोणी दिली अथवा नाही याचीही चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे सदर खोदकामाची संबंधित कंपनीने रॉयल्टी भरली आहे का? तसेच दुरवस्था झालेल्या रस्त्यांची सुधारणा करण्याबाबत ठेकेदाराने जबाबदारी घेतली आहे किंवा नाही, याबाबत चौकशी करण्यात येऊन सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा. तसेच शासन निधीचा अपव्यय करणार्‍या दोषींवर उचित कारवाई करण्यात यावी, अशी लेखी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
पंचवटी कॉलनी परिसरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आमदार शेळके यांनी आणलेल्या निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदल्याने विद्यार्थी, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी कोण करणार हा प्रश्न अनुत्तरीतच असल्याचे येथील रहिवाश्यांनी सांगितले.
आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी एमएनजीएल कंपनीस गॅस पाईपलाईनसाठी सुरु असलेले काम पुढील आदेश होईतोवर स्थगित ठेवण्याबाबत पत्र पाठविले असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले. सदर पत्राबाबत कंपनी अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
हेही वाचा 

गृहनिर्माण संंस्थांचे 601 ’डीम्ड कन्व्हेयन्स’ पूर्ण; जिल्हा उपनिबंधकांची माहिती
रुपर्ट मर्डोक पाचव्यांदा बोहल्‍यावर; रशियन सुंदरीच्या पडले प्रेमात; वयाच्या ९३ व्या वर्षी केले पाचवे लग्‍न
रेड झोनमधील बेकायदा बांधकामे डेंजर झोनमद्धे; अनधिकृत बांधकामांची संख्या स्पष्ट होणार