अरुणाचलमध्ये पुन्हा भाजप, सिक्कीममध्ये ‘एसकेएम’चा डंका

अरुणाचलमध्ये पुन्हा भाजप, सिक्कीममध्ये ‘एसकेएम’चा डंका

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल लागले. अरुणाचल प्रदेशमध्ये ६० पैकी ४६ जागा मिळवत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने तर सिक्कीम मध्ये सत्ताधारी असलेल्या क्रांतिकारी मोर्चाने ३२ पैकी ३१ जागा मिळवत दणदणीत बहुमत मिळवले. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अरुणाचल प्रदेशात केवळ १ जागा मिळवता आली तर सिक्कीममध्ये मात्र खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अरुणाचल प्रदेशात ३ जागा मिळवल्या.
देशात सात टप्प्यात पार पडलेला लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला लागणार आहेत. तत्पूर्वी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल लागले. या दोन्ही राज्यांमध्ये कोणाची सत्ता असेल हे चित्र स्पष्ट झाले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजप तर सिक्कीममध्ये पुन्हा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा सत्ता स्थापन करणार आहे. भाजपने अरुणाचल प्रदेशात १० जागा आधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. अरुणाचल आणि सिक्कीम विधानसभेसाठी १९ एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान झाले होते.
अरुणाचल प्रदेशमध्‍ये ६० पैकी भाजपचा ४६जागांवर विजय
अरुणाच प्रदेश विधानसभेत एकूण ६० जागा आहेत. यावेळी भाजप ४६ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अरुणाचलमध्ये भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या.
सिक्‍कीममध्‍ये एसकेएम पक्षाचा डंका, ३२ पैकी ३१ जागांवर दणदणीत विजय
सिक्कीममध्ये लोकसभा निवडणुकीत एसकेएम एनडीएमध्ये आहे. मात्र विधानसभा निवडणूक त्यांनी स्वतंत्र लढवली आहे. सिक्कीम विधानसभेत एकूण ३२ जागा आहेत. ३२ पैकी ३१ जागा मिळवत एसकेएमने दणदणीत विजय मिळवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत एसकेएमने १७ जागा मिळवत बहुमत मिळवले होते. गेल्या वेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला (एसडीएफ) यावेळी मात्र एकच जागा मिळाली आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा, एकूण जागा ६०
भाजप – ४६
राष्ट्रवादी (अजित पवार) – ३
काँग्रेस – १
एनपीपी – ५
पीपीए – २
इतर – ३
सिक्कीम विधानसभा, एकूण जागा ३२
एसकेएस – ३१
एसडीएफ – १