Pune Porsche Accident | अल्पवयीन मुलाच्या आईला अखेर अटक

Pune Porsche Accident | अल्पवयीन मुलाच्या आईला अखेर अटक

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील पोर्शे कारचालक अल्पवयीन मुलाच्या आईला शनिवारी (दि.1) दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. शिवानी विशाल अगरवाल (वय 49, रा. वडगावशेरी) असे तिचे नाव आहे. सकाळी साडेसात वाजता वडगावशेरी येथील राहत्या घरातून शिवानीला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला रेंजहिल्स येथील गुन्हे शाखा युनिट चारच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे शिवानीची कसून चौकशी केली. त्यानंतर तिला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
“बदललेले रक्त आपलेच”
वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. बदलण्यात आलेले रक्तनमुने मुलाच्या आईचे असल्याचे आता पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. तशी कबुली मुलाच्या आईने पोलिसांसमोर दिली आहे. तर मुलाचे बिल्डर वडील विशाल सुरेंद्र अगरवाल (वय 50) याला देखील शिवानी हिच्यासोबत अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. अपघातप्रकरणी,अकिब मुल्ला याने दिलेल्या फिर्यादीनुसार, येरवडा पोलिस ठाण्यात भादंवी कलम 304, 304 (अ), 201, 120 (ब), 279, 338, 337, 427, 466, 467, 468, 471 भ्रष्टाचार अधिनियम, 7, 7(अ),13 मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आत्तापर्यंत या गुन्ह्यात ससून रुग्णालयातील वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, प्रथमोपचार विभाग प्रमुख डॉ. श्रीहरी हाळनोर, शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे करण्यात आलेली चौकशी आणि गणेशखिंड रोड येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा यांनी दिलेल्या अहवालानुसार पोर्शे कारचा चालक अल्पवयीन मुलगा याचे ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदरम्यान रक्ताचे नमुने बदलून ते एका महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले होते.
अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीत ते रक्तनमुने अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याचे पुढे आले. त्यामुळे आत्तापर्यंतचा तपास आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल, ससूनमधील डॉ. तावरे, हाळनोर, कर्मचारी घटकांबळे या सर्वांनी संगनमत करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रक्तनमुने बदलल्याचे तपासात समोर आले. तर डॉ. तावरे यानेच विशाल याला मुलाचे रक्त नमुने बदलण्याचा सल्ला दिला होता. तसे पोलिसांच्या तापासात निष्पन्न झाले आहे. विशालला डॉ. तावरे, हाळनोर आणि कर्मचारी घटकांबळे यांनी आर्थिक प्रलोभनाला बळी पडून साथ दिल्याचे पोलिस सांगतात.
आतापर्यंत तीन गुन्ह्यांत दहा जण अटकेत
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आतापर्यंत तीन गुन्ह्यांत दहा जणांना अटक करण्यात आली असून, बिल्डरच्या कुटुंबातील तिघांचा त्यामध्ये सहभाग आहे.
डॉ. तावरेनी खबरदारी घेऊनही बिंग फुटले
ससूनमधील मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कक्षात रक्तनमुने घेण्यात आले होते. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणात मुलाला वाचविण्यासाठी ससून रूग्णालयातल डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी रक्तनमुने घेताना विशेष खबरदारी घेतली होती. त्यावेळी ससूनमध्ये एका महिलेला बोलाविण्यात आले होते. महिलेचे रक्तनमुने न्यायवैद्यक शास्त्र विभागात (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) घेण्यात आले नव्हते. मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कक्षात रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने कोणताही पुरावा राहणार नाही, याची काळजी डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी घेतली होती. मात्र पोलिस तपासात त्याचे बिंग फुटले.
रक्तनमुने महिलेचे…
रक्त नमुने बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. पल्लवी सापळे यांच्या समितीने ससूनमधील चौकशीचा अहवाल तयार केला. चौकशीत अहवालातून महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे. चाचणीसाठी पाठविण्यात आलेले रक्तनमुने एका महिलेचे होते. ससूनमधील रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या रक्तनमुन्याशी जुळले नव्हते. त्यांचा डीएनए जुळला नसल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.
पोलिस करणार डीएनए टेस्ट
मुलाचे रक्तनमुने बदलल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांना ते रक्त कोणाचे हे शोधायचे होते. त्यासाठी पोलिस जंग जंग पछाडत होते. बदलण्यात आलेले रक्त मुलाच्या आईचे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार तिला ताब्यात घेऊन अटक केली. मुलाच्या आईने ते रक्त आपले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र त्यासाठी डीएनए चाचणी करणे पोलिसांसाठी गरजेचे आहे.
पुण्यापासून जालंधरपर्यंत शिवानी फिरली
रक्तनमुने बदलल्याचे पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना अटक केली. ही माहिती शिवानीला मिळाली होती. मुलाच्या जागी तिने रक्त दिले होते. त्यामुळे पोलिस आपल्याला केव्हाही अटक करतील याची चाहूल तिला लागली होती. अटकेपासून वाचण्यासाठी तिने पुण्यातून भावाकडे जालंधरला पळ काढला. दुसरीकडे गुन्हे शाखेची पथके तिच्या मागावर होती. अटकेशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतर तिने मुंबई गाठली. पोलिसांनी तिला मुंबईत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती पुण्यात वडगावशेरी येथील घरी असल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान, उद्या, रविवारी पोलिस तिला न्यायालयात हजर करणार आहेत.
‘त्या दिवशी काय झालं, आठवत नाही’: अल्पवयीन मुलाचा पोलिसांशी असहकार
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी शनिवारी येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात एक तास चौकशी केली. त्या वेळी मुलाची आई शिवानी अगरवाल तसेच बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. अल्पवयीन मुलासह त्याच्या आईनेही पोलिसांना चौकशीत माहिती दिली नाही. तसेच त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे समजते.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची पालकांसमोर चौकशी करण्यास बाल न्याय मंडळाने पोलिसांना परवानगी दिली. त्यानंतर येरवड्यातील बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात शनिवारी अल्पवयीन मुलाची चौकशी गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी केली. अपघाताच्या वेळी मोटार कोण चालवित होते, ब्लॅक आणि कोझी पबमध्ये कोण उपस्थित होते, तसेच ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले तेव्हा कोण उपस्थित होते, याबाबतची माहिती पोलिसांनी घेतली. त्या वेळी अल्पवयीन मुलाने पोलिसांना तपासात फारशी माहिती दिली नाही. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालने उत्तरे दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशीत मुलाची त्रोटक उत्तरे
बाल न्याय मंडळात अल्पवयीन मुलाची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना त्रोटक उत्तरे दिली. त्या वेळी बाल न्याय मंडळातील सदस्य, मुलाची आई शिवानी अगरवाल उपस्थित होते. मुलाची दोन तास चौकशी करण्यात आली. अपघातावेळी मोटारीत आणखी कोण होते ? मोटार कोण चालवत होते ? अपघात नेमका कसा झाला ? यासह अनेक प्रश्न पोलिसांनी मुलाला विचारले. त्यावर ‘नेमके आठवत नाही,’ ‘लक्षात येत नाही,’ अशी उत्तरे मुलाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेची मतमोजणी सुरू
लोकसभा निवडणुकीचा स्पॉटलाईट आज 94.3 टोमॅटो एफएमवर
आ. जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर?