वृत्तनिवेदिकेच्या तोंडात गेली माशी आणि…

वृत्तनिवेदिकेच्या तोंडात गेली माशी आणि…

नवी दिल्ली : सध्या जे वयाच्या चाळीस-पन्नासच्या घरात आहेत त्यांना आपल्या लहानपणीच्या टीव्हीवरील गमतीजमती चांगल्याच आठवत असतील. दूरदर्शनवर ‘व्यत्यय’ नावाची पाटी जशी हटकून वेळोवेळी येत असे तशीच एक माशीही बातम्या सांगणार्‍या निवेदकांभोवती घिरट्या घालण्यासाठी येत असे. अर्थात या माशीचे आप्तस्वकीय अद्यापही आहेत. ते केवळ आपल्याच देशात नाहीत तर परदेशातही आहेत! सोशल मीडियावर एका महिला न्यूज अँकरचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, लाईव्ह टेलिकास्टच्या दरम्यान महिलेच्या तोंडात माशी जाते व महिला चुकीने ती माशी चक्क गिळते!
हा व्हिडीओ ‘बॉस्टन25न्यूज’ च्या अँकरचा आहे. स्कायन्यूजच्या रिपोर्टनुसार, महिला अँकर वैनेसा वेल्च मागील आठवड्यात न्यूजकास्टला होस्ट करत होती. त्यावेळी एक माशी तिच्या उजव्या डोळ्याच्या खालील पापणीवर बसली. तिला काही समजेपर्यंत माशी डोळ्यावरून उडून थेट तिच्या तोंडात गेली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कॅमेर्‍यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत दिसते की, महिलेने माशी गिळली आहे. मात्र तिने कमालीची व्यावसायिकता दाखवून अँकरिंग थांबवली नाही. काही यूजर्सने अँकरिंग न थांबवता आपले काम तसेच सुरू ठेवल्याने महिला अँकरचे कौतुक केले आहे. एका यूजरने कमेंट केले आहे की, महिला खूपच प्रोफेशनल आहे. तिने कोणतीच चुकीची रिएक्शन दिली नाही किंवा तिच्या चेहर्‍यावर कोणतीही भीती दिसली नाही.
जर तिच्याजागी दुसरे कोणी असते तर जी व्यावसायिकता महिलेने दाखवली तसे करू शकला नसता. अन्य एका यूजरने लिहिले की, बिचारी महिला. हीच आहे प्रोफेशनची नैतिकता. चांगली व वाईट दोन्ही एकत्रच असते. अन्य एका व्यक्तीने म्हटले की, या महिलेच्या वेतनात वाढ केली पाहिजे. तिने तर आपल्या पापण्या एकदाही मिचकावल्या नाहीत. खूपच अधिक प्रोफेशनलिज्म दाखवला. इन्स्टाग्रामवर एका पेज द्वारे शेअर केल्या गेलेल्या व्हिडीओला अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. दरम्यान काही लोकांचे म्हणणे आहे की, महिला अँकरच्या डोळ्यावर काहीतरी लावले होते. ते खाली पडले. मात्र व्हिडीओ पाहून समजते की, दुसरे तिसरे काही नसून माशीच आहे.