आधी मनुस्मृतीला विरोध करा, मग टीका करा

आधी मनुस्मृतीला विरोध करा, मग टीका करा

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृती दहन करण्याच्या आंदोलनात अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडण्यात आल्यानंतर राज्याचे वरिष्ठ नेते तथा मंत्री भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली होती. यावरून राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजब‌ळांनी केलेल्या पाठराखणबाबत हे दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. त्यावर भुजबळांनी प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांवर काय टीका करायची ती करा. पण टीका करायचा अधिकार तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्हाला येईल. मनुस्मृती ठेवतात बाजूला अन् जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड सुरू करतात अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
काय आहे प्रकरण?

राज्यातील शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा चंचुप्रवेश होत असेल, तर मी टीका करणार त्याविरोधात बोलत राहणार अशी जाहीर भूमिका भुजबळांनी घेतली होती.
त्यानंतर राज्यात वातावरण तापायला सुरुवात झाली त्यातच चवदार तळ्याच्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करताना त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडले गेल्याने वातावरण अधिकच तापले होते.
यावर भुजबळांनी टीका करताना मनुस्मृतीवरून लक्ष भटकू नये यासाठी आव्हाडांची पाठराखण केली होती.

काय म्हणाले होते मुश्रीफ?
दरम्यान, भुजबळांवर टीका करताना हसन मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडणे हे निंदनीय आहे. पण, आमचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा मुद्दा बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले, ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना या संदर्भात खडेबोल सुनावले पाहिजे होते. ती कृती अत्यंत चुकीची आहे, याबाबत आपण बोलायला पाहिजे होते, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
भुजबळ नेमकं काय म्हणाले?
यावर प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी, मुश्रीफ हे सिनियर आहेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. जितेंद्र आव्हाडांवर काय टीका करायची ती करा. पण टीका करायचा अधिकार तुम्हाला कधी येतो, तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तो अधिकार येईल. मनुस्मृती ठेवतात बाजूला अन् जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड सुरू केले. तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम आहे. मला मान्य आहे ते, असलेच पाहिजे. बाबासाहेबांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे. ती शालेय शिक्षणात येता कामा नये एवढेच माझे म्हणणे आहे. बाकी सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा –

Nagpur Hit And Run Case : नागपुरातील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील कार चालकास अटक
रामदेववाडी प्रकरणातील कागदपत्रे तपासणीसाठी नाशिकला, पुढील सुनावणी 1 जुलैला