कापूस बियाण्यांची जादा दराने विक्री केल्यास कारवाई!
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्र सरकारने खरीप 2024 साठी कापूस बीजी दोन या वाणाचा दर 864 रुपये इतका निश्चित केला आहे. कापूस बियाणे जादा दराने विक्री करणार्या कृषी सेवाकेंद्र तसेच कापूस उत्पादक कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, शेतकर्यांनी कापूस पिकांच्या ठराविक वाणांची मागणी करू नये, परंतु त्याच दर्जाचे इतर कंपनीच्या वाणांची उपलब्धता असल्याने खरेदीस प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यात कापूस पिकाखालील 2024 साठी क्षेत्र 40 लाख 20 हजार हेक्टर इतके आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रतिहेक्टर 4.2 पाकिटे (प्रत्येकी 450 ग्रॅम) बियाण्यांची आवश्यकता असते. तर एकूण क्षेत्राकरिता 1 कोटी 70 लाख पाकिटांची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतला असता साधारणपणे 1.75 कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कापूस बियाण्यांची कमतरता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती व अकोला या जिल्ह्यात कापूस एक प्रमुख पीक आहे. अमरावतीमध्ये 2.12 लाख हेक्टर व अकोलामध्ये 1.46 लाख हेक्टर कापूस पीक क्षेत्र आहे. अमरावती जिल्ह्यात खरीप-2024 साठी 12 लाख व अकोला जिल्ह्यासाठी 9 लाख कापूस पॅकेट पुरवठ्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामध्ये आजअखेर अमरावतीमध्ये 6.75 लाख व अकोल्यात 6.15 लाख कापूस पॅकेटचा पुरवठा करण्यात आला आहे व इतर कापूस बियाण्यांचा पुरवठा प्रगतीपथावर आहे.
दरम्यान, काही ठिकाणी कापूस जादा दराने विक्री केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर कृषी विभागातील स्थानिक कृषी सहाय्यकांच्या मदतीने संबंधित कापूस बियाण्यांचे वाटप कृषी विभागाच्या कर्मचार्यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केल्याचेही पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा
पळसदेवला ‘उजनी’त बेकायदेशीर जलवाहतूक; प्रशासन गाफील
12 th result : बारावीच्या गुणपत्रिका सोमवारी मिळणार!
..आता पुणे शहर असुरक्षित वाटते : विजय वडेट्टीवार