सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा संशोधकांना सापडला स्रोत

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा संशोधकांना सापडला स्रोत

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा स्रोत शोधला आहे. विशेष म्हणजे तो ज्याठिकाणी आहे असे यापूर्वी वाटत होते, तिथे तो नाही! हा शोध गुंतागुंतीच्या कॉम्प्युटर सिम्युलेशन्सच्या सहाय्याने लावण्यात आला आहे. त्यावरून असे दिसून आले की, सूर्याच्या पृष्ठभागावरील सर्वात बाहेरच्या स्तरांमध्ये असणार्‍या प्लाझ्मामधील अस्थिर स्थितीमध्ये हा स्रोत दडलेला आहे. यापूर्वी संशोधकांना वाटत होते की तो सूर्यामध्ये खोलवर दडलेला असावा.
‘नेचर’ या नियतकालिकामध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या शोधामुळे आता सौरज्वाळा आणि सौरवादळे यांच्याबाबतची भाकिते करण्यास अधिक मदत मिळू शकेल. या सौर घटनांमुळे पृथ्वीवरील वीज समस्या, इंटरनेट तसेच सॅटेलाईटच्या कामातील अडथळे निर्माण होतात. मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधक किटोन बर्न्स यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा शोध कदाचित वादग्रस्त ठरू शकतो.
याचे कारण म्हणजे अनेक संशोधक सूर्यावरील वेगवान घडामोडींचे मूळ त्याच्या खोल भागात शोधत असतात. मात्र, आता आम्ही निरीक्षणांना सुसंगत ठरू शकणारी वेगळीच यंत्रणा त्यांना दाखवत आहोत. सूर्य हा प्लाझ्माचा मोठा गोळा आहे. त्याचे भारीत कण शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात. या चुंबकीय क्षेत्राची निर्मिती कुठून होते. याबाबत दीर्घकाळापासून संशोधन सुरू होते. त्यासाठी यापूर्वीही एक थ्रीडी कॉम्प्युटर सिम्युलेशनचा वापर करण्यात आला होता. पण, त्याचा उपयोग झाला नाही.