‘स्वयंपाकी’ मानधन घोटाळ्याची रक्कम 50 लाखांवर?

‘स्वयंपाकी’ मानधन घोटाळ्याची रक्कम 50 लाखांवर?

विकास कांबळे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शालेय पोषण आहार योजनेत काम करणार्‍या स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधन घोटाळ्याची रक्कम 23 लाख सांगण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात ही रक्कम 50 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे.
डाटा ऑपरेटरने पतीसह सासू, भाऊ, भावाचा मित्र, पतीचा मित्र अशी 9 खाती काढून, त्यावर स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनाची रक्कम भरून घोटाळा केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेने संबंधित बँकेकेडे सविस्तर माहिती मागविली आहे. गेल्या तीन वर्षांतील ही माहिती मागविल्यामुळे घोटाळ्याची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मानधन तत्त्वावर स्वयंपाकी व मदतनीसांची नियुक्ती केली आहे. या स्वयंपाकींचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. डाटा ऑपरेटने ही रक्कम परस्पर आपल्या नातेवाइकांच्या खात्यावर जमा करून, डल्ला मारल्याची जिल्हा परिषदेत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. परंतु डाटा ऑपरेटच्या पतीने लेखाधिकारी दीपक माने यांचे अपहरण करून, त्यांना मारहाण केल्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हाही नोंद झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी जि.प.नेे समिती स्थापन केली आहे. परंतु चौकशी समितीतील सदस्य निवडणूक कामासाठी नियुक्त केल्यामुळे ही चौकशी थांबली होती. निवडणूक झाल्यानतंर चौकशी समिती तत्काळ या चौकशी सुरू करेल, अशी अपेक्षा होती. परंतु संथगतीने याची चौकशी सुरू आहे.
या मानधन घोटाळ्यात 23 लाखांचा अपहार केल्याचे बोलले जात होते; परंतु चौकशी समितीने चौकशी सुरू केल्यानंतर मात्र ही रक्कम दुप्पट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय या चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचे बोलले जाते.
नऊ खात्यांवर रक्कम वर्ग
डाटा ऑपरेटरने मानधनाची रक्कम नऊ लोकांच्या नावावर बँक खाते काढून, त्यावर वर्ग करत स्वयंपाकी व मदनीसांच्या मानधनावर डल्ला मारल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. बँकेकडून माहिती आल्यानंतर कोणाच्या खात्यावर किती रक्कम वर्ग केली आहे, ते स्पष्ट होईल.
काही अधिकार्‍यांची चौकशी होण्याची शक्यता
स्वयंपाकी मानधन घोटाळा प्रकरणामध्ये डाटा एंट्री ऑपरेटरबरोबर शिक्षण विभागातील काही अधिकार्‍यांचीही चौकशी होण्याची शक्यता असल्यामुळे अधिकार्‍यांचेही धाबे दणाणले आहेत.