‘महाराष्ट्र केसरी’ला मिळेना ‘कर्नाटक केसरी’ची जोड

‘महाराष्ट्र केसरी’ला मिळेना ‘कर्नाटक केसरी’ची जोड

ज्ञानेश्वर पाटील

बेळगाव : बेळगावसह मराठीबहुल सीमाभाग सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी जोडला गेला असून सीमाभागातील मल्लांना महाराष्ट्र केसरी किताबाबद्दल आकर्षण आणि आदर आहे. बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी 40 हून अधिक जंगी आखाडे भरतात. मात्र सर्वच मोठ्या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान विरुध्द उत्तर भारतातील मल्लांशी असते. महाराष्ट्र केसरी वि. कर्नाटक केसरी अशी जोड होण्यासाठी 30 वर्षांपासून प्रतीक्षा आहे. ही जोड तयार करण्याचे कुस्तीशी संबंधित घटकांसमोर तगडे आव्हान असणार आहे.
40 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील मल्ल सीमाभागातील पैलवानांची धास्ती घ्यायचे, अशी आजही चर्चा होत असते. सीमाभागातील पूर्वीचे मल्ल वजनदार आणि ताकदवान होते. चंबा मुत्नाळ, कल्लाप्पा शिरोळ, राजकुमार मठपती यांनी महाराष्ट्र केसरी पैलवानांशी शड्डू ठोकले आहेत. बेळगाव जिल्ह्यात चंबा मुत्नाळ, चंद्रू काडेनकोप, चिंटू घाडीकोप, चंद्रकांत डोंगरे हे कर्नाटक केसरीचे मानकरी आहेत. गेल्या 35 वर्षात बेळगावात पैलवानांची संख्या वाढली, पण एकाही मल्लाला कर्नाटक केसरीची गदा पटकावता आली नाही. सीमाभागातील मल्लांनी कर्नाटक केसरी नव्हे महाराष्ट्र केसरी होणार्‍या मल्लांसारखी तयारी करण्याची गरज आहे.
बेळगाव जिल्ह्यात सध्या पाचशेहून अधिक मल्ल सराव करत आहेत. महाराष्ट्र केसरी पैलवानांशी दोन हात करण्यासाठी तंत्र, वजन आणि ताकद या तीन गोष्टी एकत्रित असणे आवश्यक आहे. स्थानिक मल्लांमध्ये याचीच कमतरता असल्याने महाराष्ट्र केसरी- कर्नाटक केसरी लढत होत नाही. कामेश पाटील, प्रेम कंग्राळी यांचे वजन शंभरपयर्र्त असले तरी ताकद आणि तंत्रामध्ये कमी पडत असल्याने महाराष्ट्र केसरीशी लढू शकत नाहीत. सध्याचे कर्नाटक केसरी कार्तिक काटे, सुनील फडताळे, पांडुरंग शिंदे हे वजन, ताकद आणि तंत्राच्या बाबतीत कमी आहेत. जानेवारी ते मेपर्यंत सीमाभागात कुस्ती आखाडे भरत असताना या मैदानात नव्या दमाचे पैलवान लक्ष वेधून घेतात. त्यांना महाराष्ट्र केसरी मल्लाशी भिडण्यासाठी आवश्यक बाबींची तयारी आतापासूनच करावी लागेल.
दोन केसरीत मोठी तफावत
कर्नाटक केसरी पैलवानाला महाराष्ट्रातील दहा ते बारा क्रमांकावर खेळणारा मल्लही चितपट करु शकतो. सध्याचा एकमेव कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार याला तसा अनुभव आला आहे. महाराष्ट्र केसरी पैलवान हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळू शकतात. अशी त्यांची घडण झालेली असते. त्या तुलनेत कर्नाटक केसरी सर्वच पातळीवर तोकडे पडतात. बेळगाव जिल्ह्यात सध्या शेकडो मल्ल तयार होत असून त्यांची ‘कर्नाटक केसरी’ होण्यासाठी धडपड आहे. कर्नाटक केसरी झाले तरी महाराष्ट्र केसरीशी सामना करण्याची क्षमता कधी तयार होणार, हा प्रश्न आहे.