नरेंद्र मोदी यांच्यासारखाच पंतप्रधान पाकिस्तानला हवा

नरेंद्र मोदी यांच्यासारखाच पंतप्रधान पाकिस्तानला हवा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नरेंद्र मोदी हे जन्मजात नेते आहेत. त्यांनी भारताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्यासारखाच पंतप्रधान पाकिस्तानला मिळायला हवा, असे उद्गार पाकिस्तानी अमेरिकन उद्योगपती साजीद तरार यांनी काढले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची जगाला भुरळ पडल्याची अनेक उदाहरणे आहेत; पण पाकिस्तानी व्यक्तीही मोदी यांचे कौतुक करण्यास कचरत नाहीत. साजीद तरार या पाकिस्तानी अमेरिकन उद्योगपतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत तरार म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे धाडसी नेते आहेत. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला भेट दिली होती. त्यांनी त्यांचे राजकीय भवितव्य पणाला लावले होते. मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या काळात भारताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. पाकिस्तानला मोदी यांच्यासारखा नेता मिळायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तरार पुढे म्हणाले की, मोदी पंतप्रधान असणे हे भारतासाठीच नाही, तर आशिया खंडासाठी आणि जगासाठीच उत्तम आहे. शांत पाकिस्तान ही जशी पाकिस्तानच्या प्रगतीसाठी चांगली बाब आहे, तसेच ते भारतासाठीही चांगले आहे.
मोदीच होतील पुन्हा पंतप्रधान
तरार म्हणाले की, भारतात 97 कोटी लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, हा एक चमत्कारच आहे. 2024 मधील भारताचा
उदय डोळे दीपवणारा आहे. हे तेथील
लोकशाहीचेच यश आहे. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता आम्हाला येथे अमेरिकेतही जाणवते. त्यामुळेच या निवडणुकीतही मोदी आणि भाजप यांना घवघवीत यश मिळेल आणि तेच पुन्हा पंतप्रधान होतील.