ऐन उन्हाळ्यात शेततळी ठरताहेत वरदान; इंदापूरमधील फळबागांना फायदा

ऐन उन्हाळ्यात शेततळी ठरताहेत वरदान; इंदापूरमधील फळबागांना फायदा

संतोष ननवरे

शेळगाव : दुष्काळमुक्त शेती व्यवसाय करण्यासाठी व फळबागांसह अन्य पिकांना संरक्षित पाणीसाठा उपलब्धतेसाठी शेततळ्यांचा वापर होऊ लागला असून, इंदापूर तालुक्यात ऐन दुष्काळात गावोगावी असलेली शेततळी शेतकर्‍यांना वरदान ठरत आहेत. तालुक्यातील हजारो हेक्टर फळबाग शेतीला व अन्य पिकांसाठी शेततळ्यातील पाण्याचा फायदा होत दुष्काळावर बर्‍यापैकी मात करणे शेतकर्‍यांना शक्य होऊ लागले आहे.
शासनाच्या वतीने सामुदायिक शेततळे योजना, मागेल त्याला शेततळे योजना तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजनेंतर्गत अनुदान आदी योजना अमलात आणल्या आहेत. आजअखेर इंदापूर तालुक्यात 2 हजारांहून अधिक छोटी-मोठी शेततळी शेतकर्‍यांनी उभारलेली आहेत. खर्‍या अर्थाने पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांत प्रथम इंदापूर तालुक्यातील बोरी या छोट्याशा गावातून शेततळ्याची चळवळ शेतकर्‍यांकडून उभारली गेली. सध्या शेततळ्याचे गाव म्हणून बोरीची ओळख निर्माण झाली आहे. येथील शेतकरी शेततळ्यांतील पाण्यावर द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळासह अन्य फळबागा तसेच इतर पिकांचे नियोजन उत्तमरीत्या करताना दिसून येत आहेत. पावसाळ्यामध्ये शेतकरी शेततळ्यामध्ये पाण्याचा साठा करून ठेवत असून, त्याचा फायदा ऐन उन्हाळ्यात होत आहे.
तालुक्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 1149 छोटी-मोठी शेततळी आहेत. सामुदायिक शेततळे योजना तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजनेंतर्गत आजअखेर 2 हजारांहून अधिक शेततळी आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामुदायिक शेततळे योजनेस 5 लाखांपर्यंत अनुदान शेतकर्‍यांना मिळाले आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजनेंतर्गत 1 कोटी लिटर क्षमतेच्या 34 बाय 34 आकाराच्या शेततळ्यास 75 हजार रुपये कागद अस्तरीकरणासाठी व 75 हजार खोदाईसाठी, असे एकूण दीड लाख रुपयांचे अगदी अल्प प्रमाणात अनुदान मिळत आहे. मात्र, शेततळे खोदण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 लाखांहून अधिक रुपयांचा खर्च शेतकर्‍यांना येत आहे. शेततळ्याला पाण्याच्या साठवण क्षमतेनुसार लाखोंच्या पटीत खर्च येत आहे. मात्र, शासनाकडून मिळणारे अनुदान अगदी तुटपुंजे आहे, त्यामुळे शेततळ्यासाठी शासनस्तरावरून अनुदानाच्या रकमेमध्ये भरघोस वाढ करण्यात यावी, अशी मागणी इंदापूर तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकर्‍यांकडून होत आहे.
अनेक गावांमध्ये प्रतिसाद
कळस, अकोले, निरगुडे, म्हसोबावाडी, बोरी, काझड, तरंगवाडी, गोखळी, अंथुर्णे, शेळगाव, निमगाव केतकी, वडापुरी, शेटफळ हवेली, सुरवड, भोडणी, लाखेवाडी, बावडा आदी गावांमध्ये देखील शेततळ्यांची संख्या जास्त असल्याचे इंदापूर तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
सर्वप्रथम झाले बोरी येथे शेततळे
आगामी काळात दुष्काळमुक्त शेती व्यवसायाकडे शेतकरी वळू लागले असून, यासाठी शेततळे करून मोठ्या प्रमाणात शेतकरी फळबाग शेतीकडे वळलेले दिसून येत आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वांत आधी बोरी या गावातून शेततळ्याची चळवळ शेतकर्‍यांनी सुरू केली. आता तालुक्यात ही चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकट्या बोरी या छोट्याशा गावामध्ये 200 हून अधिक संख्येने शेततळी आहेत. येथील शेतकर्‍यांकडे प्रामुख्याने द्राक्षबागाच आहेत.
हेही वाचा

काचेवर हातोडीने तडे देऊन बनवली पोर्ट्रेट्स्!
शिरूरमध्ये परवानगीविनाच होर्डिंग! प्रशासनाला जाग येणार तरी कधी?
कंगना रणौतच्या इमरजन्सीची रिलीज तारीख पुन्हा पुढे ढकलली