धक्कादायक! दारूच्या नशेत मित्राचा खून; जेजुरी पोलिसांकडून दोघांना अटक

धक्कादायक! दारूच्या नशेत मित्राचा खून; जेजुरी पोलिसांकडून दोघांना अटक

जेजुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : जेजुरी पोलिस ठाणे हद्दीतील वाल्हे गावानजीक असणार्‍या एका ढाब्यावर दारूच्या नशेत एका तरुणाच्या डोक्यात वीट आणि बाटलीने मारहाण करून तिघा मित्रांनी गंभीर जखमी केले. गंभीर जखमी असणार्‍या या तरुणाचा मृत्यू झाला असून, जेजुरी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पवन संभाजी शेलार (वय 26, रा. काळदरी, ता. पुरंदर, ह. मु. जेजुरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विकास अर्जुन भोसले (रा. पिंगोरी) आणि अविनाश आत्माराम पवार (रा. आडाचीवाडी, वाल्हे, ता. पुरंदर) या दोघांना अटक केली असून, तिसरा आरोपी तुषार शरद यादव (रा. पिंगोरी) हा पळून गेला.
मंगळवारी (दि. 14) वरील चौघे वाल्हेनजीक असणार्‍या ढाब्यावर गेले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत पैशाच्या कारणावरून पवन शेलार व तुषार यादव, विकास भोसले, अविनाश पवार यांच्यात भांडण झाले. या वेळी या तिघांनी पवन शेलारच्या डोक्यात वीट व बाटलीने मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. अशा गंभीर अवस्थेत पवन शेलार यास सोडून तिघे आरोपी पळून गेले.
पवन शेलार यास उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचा बुधवारी (दि. 15) मृत्यू झाला. पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे, असे जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले. याप्रकरणी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी दर्शन दुगड, सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करीत आहेत.
हेही वाचा

कंगना रणौतच्या इमरजन्सीची रिलीज तारीख पुन्हा पुढे ढकलली
अपक्षांना मिळणाऱ्या मतांवर ठरणार नाशिकचे गणित
जलसंपदा विभागाच्या जागेत होर्डिंगरूपी यमराज..!