बारामतीतही बेकायदा होर्डिंग्जच्या विळख्यात; अनेक होर्डिंग्ज परवानगीविना

बारामतीतही बेकायदा होर्डिंग्जच्या विळख्यात; अनेक होर्डिंग्ज परवानगीविना

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईमध्ये घाटकोपर येथे बेकायदेशीर होर्डिंग कोसळ्यामुळे अनेकांचा जीव गेल्यानंतर बारामतीतही होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरात अनेक बेकायदेशीर होर्डिंग्ज असून, त्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाईला वेग येणार का, हा प्रश्न आहे. शहरातील बहुसंख्य होर्डिंग्ज परवानगीविनाच उभे आहेत. ग्रामीण भागातही मुख्य रस्त्यांवर, रस्त्यांच्या वळणावर असे होर्डिंग्ज लागलेले आहेत. शेतकर्‍यांच्या शेतात त्यासाठी जागा घेतली गेली आहे. परंतु, ग्रामीण भागातील हे होर्डिंग्ज कोसळले तरी निर्मनुष्य भाग असल्याने तेथे अपघाताची फारशी चिंता नाही.
शहरात मात्र वर्दळीच्या ठिकाणीच ही होर्डिंग्ज लागलेली आहेत. ती धोकादायक ठरू शकतात.
बारामती नगरपरिषदेने आत्तापर्यंत दोन वेळा बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणार्‍यांना नोटिसा दिल्या आहेत. विनापरवानगी होर्डिंग्ज लावणार्‍यांवर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
– महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती

बेकायदेशीर होर्डिंग्जबाबत सर्व्हे करावा
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून धोकादायक इमारतींचा सर्व्हे करत त्यांना नोटिसा बजावल्या जातात. तसा बेकायदेशीर होर्डिंग्जबाबत सर्व्हे करणे गरजेचे बनले आहे. अनेक होर्डिंग्ज शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, तसेच व्यापारी पेठेतील गजबजलेल्या भागात आहेत. तेथे अपघाताचा धोका अधिक संभवतो.
होर्डिंग्जची संख्या पालिकेलाच नाही माहीत
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड ते अगदी बारामतीतही यापूर्वी वादळी वारे, पावसाने असे होर्डिंग्ज कोसळून अपघात घडले आहेत. बारामतीत अनेक मुख्य चौकांसह विविध इमारतींवर असे होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत. रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंसह विविध ठिकाणी होर्डिंग्ज दिसून येतात. विशेष म्हणजे शहरात होर्डिंग्ज किती आहेत, याची कोणतीही माहिती पालिकेकडे नाही.
…तर सोमवारी बारामतीत दुर्घटना घडली असती
सोमवारी रात्री बारामतीतही जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाला. वार्‍याचा वेग कमालीचा होता. या वेगामुळे इमारतींवरील होर्डिंगचे कापड फाटले गेले. हे होर्डिंग जर कोसळले असते, तर मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले असते. पालिकेकडून अशा होर्डिंगवर कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा

Leopard News | जुन्नरला चाळकवाडी वामनपट्टा येथे बिबट्या जेरबंद..
मुळशीत होर्डिंग्जची स्पर्धा; प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत पडलेय सुस्त
सोलापूर : मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू