हार्दिक-रोहितचा वाद! पंड्या सरावाला येताच हिटमॅन-सूर्या मैदानाबाहेर

हार्दिक-रोहितचा वाद! पंड्या सरावाला येताच हिटमॅन-सूर्या मैदानाबाहेर

मुंबई, वृत्तसंस्था : IPL 2024 : मुंबई इंडियन्सचे इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. हंगामाच्या सुरुवातीला हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवल्यापासूनच चाहते व संघात अंतर्गत नाराजी पसरली होती. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला आणि त्यांना गाशा गुंडाळावा लागला. हार्दिक व संघातील सीनियर खेळाडूंमध्ये वाद सुरू असल्याच्या बातम्याही अधूनमधून येत होत्या. संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर हे वाद आणखी वाढल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यातच कोलकात्यात हार्दिक फलंदाजीसाठी नेटस्मध्ये आला, तेव्हा रोहित सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांच्यासोबत मैदानाबाहेर गेला. आता यावरूनही चर्चा रंगली आहे.
मुंबई इंडियन्स 17 तारखेला लखनौ सुपर जायंटस्विरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. मुंबईला 13 पैकी 4 सामन्यांत विजय मिळवता आला आहे आणि शेवटचा साखळी सामना जिंकून तळाचे स्थान टाळण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. पण, सराव सत्रातही रोहित व हार्दिक यांच्यातला वाद स्पष्टपणे दिसला. हार्दिक जेव्हा सरावासाठी नेटस्मध्ये आला तेव्हा रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी नेटस्मधून काढता पाय घेतला. हार्दिक व रोहित यांनी एकत्रित सराव केला नाही.
केकेआरविरुद्धच्या लढतीपूर्वीची ही घटना आहे, जिथे मुंबईला पराभव पत्करावा लागला. रोहितने नेटस्मध्ये पहिला फलंदाजीचा सराव केला आणि तेव्हा हार्दिक जवळपास नव्हता. पण, जेव्हा हार्दिक फलंदाजीसाठी नेटस्मध्ये आला, तेव्हा रोहित सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांच्यासोबत मैदानाबाहेर गेला. या तिघांच्या कृतीमुळे मुंबई इंडियन्सचा संघ दोन गटांत विभागला गेला आहे, या चर्चेला खतपाणी मिळत आहे. (IPL 2024)
केकेआर विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने सांगितले होते की, फलंदाजीची बाजू म्हणून आम्ही पाया मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर आम्ही त्याचा फायदा उठवू शकलो नाही आणि गती राखू शकलो नाही. पावसामुळे गोलंदाजांची गती निर्णायक ठरत होती, पण मला वाटले की, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. (IPL 2024)