IPL 2024 : पाऊस करणार आरसीबीचा घात?

IPL 2024 : पाऊस करणार आरसीबीचा घात?

बंगळूर, वृत्तसंस्था : आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहे. पण, या सामन्यापूर्वी चाहत्यांचे टेन्शन वाढले. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. 18 मे रोजी बंगळूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामना झाला नाही आणि गुण विभागून दिले तर रॉयल चॅलेंजर्सचा घात होणार आहे.
बेंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून 13 सामन्यांतून 6 विजयांसह 12 गुण आहेत. त्याच वेळी, त्याचा निव्वळ रनरेट +0.387 आहे, जो अनेक संघांपेक्षा चांगला आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आरसीबीला 14 गुणांपर्यंत पोहोचावे लागेल आणि त्यासाठी त्यांना चेन्नई सुपर किंग्जला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. (IPL 2024)
येत्या शनिवारी होणार्‍या सामन्याबाबत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी चांगली बातमी नाही. हवामान खात्यानुसार 18 मे रोजी पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्द झाल्यास आरसीबीला फक्त 1 गुण मिळतील आणि त्याचे एकूण केवळ 13 गुण असतील, तर सध्या चार संघांचे 14 किंवा त्याहून अधिक गुण झाले आहेत. अशा परिस्थितीत आरसीबीचे 13 गुण होतील आणि संघ प्ले ऑफमधून बाहेर पडेल.
दुसरीकडे सामना रद्द झाल्यास, चेन्नई सुपर किंग्जचे 15 गुण होतील आणि त्यानंतर प्ले ऑफसाठी लखनौ सुपर जायंटस् आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.