सावकारकीला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपवले; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

सावकारकीला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपवले; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

कुरुंदवाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : शेडशाळ (ता.शिरोळ) येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे (वय 44) या शेतकऱ्याने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये मंगळवारी (दि.14) दुपारी गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी श्रीमती रेखा भालचंद्र तकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच सावकारांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेल्या संशयित सावकार रविकांत धनपाल जगताप, चंद्रकांत धनपाल जगताप(दोघे रा. कवठेगुलंद ता शिरोळ), बाबु आप्पासो नाईक, विजय पापा नाईक, महादेव गणु नाईक( तिघे रा. शेडशाळ ता.शिरोळ) अशी नावे आहेत. दरम्यान एका संशयिताला कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भालचंद्र तकडे यांनी आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये मंगळवारी (दि.14) दुपारी 1च्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या खिश्यात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पाच सावकारांची नावे लिहून यांनी मला मारण्याची धमकी दिली. त्यांच्या कर्जाला कंटाळून मी जीवन संपवत आहे. असे तकडे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहले आहे.
तकडे यांच्या पत्नी श्रीमती रेखा तकडे यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, रविकांत जगताप, चंद्रकांत जगताप, बाबु नाईक, विजय नाईक, महादेव नाईक यांच्याकडून व्याजाने रक्कम घेतली होती. रक्कम मागणी करण्यासाठी त्यांनी तगादा लावून आम्हाला समक्ष भेटून आणि फोनवरून धमकी देऊन मानसिक त्रास दिला होता. त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच माझ्या पतीने जीवन संपल्याचे म्हटले आहे.
प्रकरण दडपण्यासाठी राजकीय नेत्यासोबत, माध्यम प्रतिनिधीचा केविलवाणा प्रयत्न
सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आर्थिक देवाण-घेवाण करून हे प्रकरण दडपण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी आणि एका माध्यम प्रतिनिधीने केविलवाणा प्रयत्न सुरू केला होता. ते सकाळपासूनच दर्गा चौकात ठाण मांडून होते. यामुळे कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या परिसरात चर्चा होती.