उद्यापासून नागपुरातील होर्डिंग्जचे सर्व्हेक्षण; अवैध होर्डिंग संदर्भात प्रशासन हादरले
राजेंद्र उट्टलवार
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईत घाटकोपर परिसरात वादळ वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाने उडविलेली धूळधाण आणि अवैध होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून अनेकांचा झालेला मृत्यू प्रकरणानंतर मुंबईत होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर नागपुरातही अवैध होर्डिंग्ज प्रकरणात प्रशासन हादरले आहे. मंगळवारी आयुक्त पातळीवर सर्व झोनच्या अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.
चंद्रपूर शहरातील अवैध होर्डिंगधारक आहेत. त्यांनी अवैध होर्डिंग २४ तासाच्या आत काढले नाही. तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. नोटिसनंतरही २४ तासाच्या आत जर होर्डिंगधारकांनी त्यांचे अवैध होर्डिंग काढले नाही तर मनपातर्फे निष्कासनाची तसेच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
निष्कासनाची कारवाई करतांना जो काही खर्च लागेल तो या होर्डिंगधारकांकडूनच वसूल केला जाणार आहे. महानगरपालिका हद्दीत डिजिटल पोस्टर्स, जाहिरात होर्डिंग, बॅनर उभारतांना मनपाकडून परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते. मात्र अनेकदा परवानगी न घेता होर्डिंग उभारण्यात येते व आवश्यक ती काळजी न घेतल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता असते. हे मुंबईमधील दोन घटनांनी पुढे आले आहे.
नागपुरात नियमानुसार १०५३ होर्डिंग
नागपुरात आकाशचिन्हे स्काय साईन्स, नियम २०२२ च्या मानकानुसार शहरात १०५३ नियमानुसार होर्डिंगस आहेत. २०२२- २३ मध्ये या संदर्भात सर्वे करण्यात आला होता. अवैध होर्डिंगबाबत संबंधितांना नोटीस, समज देण्यात आली होती. मुंबईतील घटनेनंतर पुन्हा एकदा आयुक्तांनी निर्देश दिल्यानुसार उद्यापासून (१५ मे) शहरात तीन चमू होर्डिंगचे फेर सर्वेक्षण करणार असून मनपा अनुमतीने उभारलेले व अनुमती नसलेले होर्डिंग यासोबतच त्यांचे सिव्हिल स्ट्रक्चर या दृष्टीनेही पाहणी केली जाणार असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी ‘Bharat Live News Media’ शी बोलताना दिली.
मनपा हद्दीत सार्वजनिक रस्त्यावरील होर्डिंग लावताना मनपाची परवानगी आवश्यक असल्याचे नमूद करतानाच त्यांनी मनपा हद्दीत मात्र मनपाच्या परवानगीशिवाय रेल्वेच्या जागेवरही मोठ्या प्रमाणात होर्डिंग उभारले जातात याकडे लक्ष वेधले. आता पुन्हा एकदा यानिमित्ताने नागपूरात मोठ्या प्रमाणात लागलेल्या नियमाधीन, नियमबाह्य होर्डिंगची वस्तुस्थिती या फेर आढाव्यातून पुढे येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.