ब्रेकिंग! शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्या

ब्रेकिंग! शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra MLC Election) २ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. निवडणूक आयोगाने ८ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यात मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. या ४ जागांसाठी १० जूनला मतदान आणि १३ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केले होते. पण आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुका घ्याव्यात असे निवेदन निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. याची दखल घेत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
मुदत ७ जुलै रोजी संपणार
मुंबई पदवीधर संघातील सदस्य विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधरमधील निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातील किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील सदस्य कपिल हरिशचंद्र पाटील यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. या ठिकाणी निवडणुका होणार आहेत.
सध्या लोकसभा निवडणूक सुरु आहे. तसेच सलगच्या निवडणुकांमुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढणार हाेता. यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. राज्यातील शिक्षक संघटनांनी या संदर्भात थेट केंद्रीय निवडणूक आयोगालाकडेच पत्र व्यवहार केला. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.  (Maharashtra MLC Election)

हे ही वाचा :

आमचे सरकार पॉझिटिव्ह अन् प्रॅक्टिकल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
माेदींविराेधात तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात,काेण आहेत अजय राय?