कळंबला मतदार यादीत गोंधळ; नावे नसल्याने मतदानापासून वंचित

कळंबला मतदार यादीत गोंधळ; नावे नसल्याने मतदानापासून वंचित

मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : कळंब (ता. आंबेगाव) येथे जवळपास 150 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. मतदार यादीत या मतदारांची नावे पूर्वीपासून आहेत. परंतु, या वेळी नावे गायब झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही नव मतदारांनी नावे नोंदवूनसुद्धा यादीत नाव न आल्याने नवमतदार नाराज झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे यांनी ही माहिती दिली.
खुर्शीदबी इब्राहिम शेख (वय 67) या गेली 45 वर्षांपासून मतदान करीत आहेत. ग्रामपंचायतीला पंधरा महिन्यांपूर्वी त्यांनी मतदान केले. परंतु, लोकसभेला त्यांचे नाव गायब झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. नवमतदार अक्षय मारुती काळे यांच्यासह जवळपास 40 ते 45 तरुणांनी मतदारयादीत नोंदणी केली होती. परंतु 30 ते 35 नावे यादीत आली नाहीत. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. कोमल प्रशांत कानडे, सदाशिव धोंडीबा कानडे यांची नावे पूर्वीपासून वॉर्ड क्रमांक पाचमध्ये होती. परंतु, त्यांची नावे वॉर्ड क्रमांक तीनमध्ये समाविष्ट झाली. अशी जवळपास 40 मतदारांची नावे विविध वॉर्डामध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांना मनस्ताप झाला.
कळंब येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, बीएलओ यांनी यादी करताना चुकून काही नावांपुढे मयत लिहिल्यामुळे ती नावे कट झाली असतील. आम्हाला मतदारांची जी अंतिम यादी मिळाली आहे त्यानुसारच आम्ही कार्यवाही करतो.मतदारांची नावे गायब झाल्याने टक्केवारी घटणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांनी सांगितले.
हेही वाचा

इंडोनेशियातील पूरबळींची संख्‍या ५० वर, २७ बेपत्ता
Shirur loksabha : शिरूरमध्ये माझा विजय निश्चित : आढळराव पाटलांचा विश्वास
महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील : मंत्री दिलीप वळसे पाटील