Leopard News | काळवाडीत बिबट्या जेरबंद; जुन्नर तालुका आपत्ती क्षेत्र जाहीर करा

Leopard News | काळवाडीत बिबट्या जेरबंद; जुन्नर तालुका आपत्ती क्षेत्र जाहीर करा

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : काळवाडी (ता. जुन्नर) येथे वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यामध्ये सोमवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. हा बिबट्या मादी असून, त्याचे वय पाच ते सहा वर्षे असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर, आळेफाटा, धोलवड, राजुरी, आर्वी, गुंजाळवाडी, पिंपळगाव, कुरण शिरोली खुर्द, शिरोली बुद्रुक, कुमशेत, धालेवाडी,ओझर, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक, धोलवड या भागातसुद्धा बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले होत आहेत.
वन खात्याने या परिसरातील बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना पकडून बंदिस्त करावे अथवा ताडोबाच्या जंगलात सोडून द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी केली आहे. तसेच जुन्नर तालुका आपत्ती क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. दरम्यान, बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने वन अधिकारी व कर्मचारी गावोगावी फिरून बिबट्या संदर्भामध्ये जनजागृती करीत असून, बिबट्यापासून बचाव कसा करावा, याबाबतचे मार्गदर्शन करीत आहेत.
काळवाडी परिसरात 20 बिबटे असल्याचा अंदाज
दरम्यान, या भागामध्ये अद्यापही बिबटे असल्याने येथील पिंजरे दुसरीकडे हलवण्यात येऊ नये, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. काळवाडी, पिंपळवंडी, पिंपरी पेंढार व उंब्रज परिसरामध्ये बिबट्यांची संख्या 15 ते 20 असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांचा आहे. त्यामुळे वन खात्याकडे या बिबट्यांना पकडण्याची मागणीदेखील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा

Nashik | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आजपासून मतदान
दुपारनंतर मतदारराजाची केंद्रांवर गर्दी; सायंकाळी केंद्रांबाहेर रांगा
Loksabha election | पुणेकरांच्या मताचा वाढीव टक्का, कुणाच्या पारड्यात जाणार?