CBSE | दहावी, बारावीच्या निकालाच्या टक्क्यात वाढ..!

CBSE | दहावी, बारावीच्या निकालाच्या टक्क्यात वाढ..!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी (दि.13) जाहीर करण्यात आला. त्यात बारावीचा 87.98 टक्के, तर दहावीचा निकाल 93.60 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही परीक्षांच्या निकालात किंचित वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर बारावीचा निकाल 89.91 टक्के, तर दहावीचा 96.53 टक्के लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीबीएसईने प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. गेल्यावर्षी दहावीचा निकाल 93.12 टक्के, तर बारावीचा निकाल 87.33 टक्के लागला होता. त्यामुळे दहावीच्या निकालात 0.48 टक्के, तर बारावीच्या निकालात 0.65 टक्क्यांनी वाढ झाली. बारावीसाठी राज्यातून 32 हजार 561 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 32 हजार 346 विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 36 विद्यार्थी ( 89.77 टक्के ) उत्तीर्ण झाले. त्यात 87.93 टक्के मुले, तर 91.88 टक्के मुली आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एक लाख सात हजार 833 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या एक लाख सात हजार 655 विद्यार्थ्यांपैकी एक लाख तीन हजार 916 विद्यार्थी (96.53 टक्के) उत्तीर्ण झाले. त्यात 96.02 टक्के मुले, तर 97.21 टक्के मुली आहेत.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी देशभरातून 16 लाख 33 हजार 730 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 16 लाख 21 हजार 224 विद्यार्थ्यांपैकी 14 लाख 26 हजार 420 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालात उत्तीर्णांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.52, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 81.12 टक्के आहे. बारावीच्या 24 हजार 68 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा अधिक, तर एक लाख 16 हजार 145 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले. पुणे विभागातून नोंदणी केलेल्या 34 हजार 715 विद्यार्थ्यांपैकी 34 हजार 494 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
त्यापैकी 30 हजार 969 विद्यार्थी (89.78 टक्के) उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. 87.87 टक्के मुले आणि 91.98 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. बारावीच्या परीक्षेसाठी परदेशातील 20 हजार 411 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 20 हजार 355 विद्यार्थ्यांपैकी 19 हजार 508 विद्यार्थी (95.84 टक्के) उत्तीर्ण झाले. बारावीचे एकूण एक लाख 22 हजार 170 विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यावी लागणार आहे. देशभरातून दहावीच्या परीक्षेसाठी 22 लाख 51 हजार 812 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 22 लाख 38 हजार 827 विद्यार्थ्यांपैकी 20 लाख 95 हजार 467 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. 92.71 टक्के मुले, तर 94.75 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. दहावीच्या परीक्षेत दोन लाख 12 हजार 384 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक, तर 47 हजार 983 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. दहावीच्या एक लाख 32 हजार 937 विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यावी लागणार आहे.
त्रिवेंद्रम विभागाची आघाडी
बारावीच्या विभागनिहाय निकालात त्रिवेंद्रम विभागाने 99.91 टक्क्यांसह देशात आघाडी मिळवली. त्या खालोखाल विजयवाडा विभागाचा 99.04 टक्के, तर चेन्नई विभागाचा 98.47 टक्के निकाल लागला. प्रयागराज विभागाचा निकाल सर्वांत कमी 78.25 टक्के लागला. दहावीच्या विभागनिहाय निकालात त्रिवेंद्रम विभागाने 99.75 टक्क्यांसह देशात बाजी मारली. त्या खालोखाल विजयवाडा विभागा 99.60 टक्के, चेन्नई विभागा 99.30 टक्के निकाल लागला. गुवाहाटी विभागाचा निकाल सर्वांत कमी 77.94 टक्के लागला असल्याचे दिसून येत आहे.
पुणे विभागात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक
पुणे विभागातून एक लाख 10 हजार 685 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एक लाख 10 हजार 498 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख सहा हजार 585 विद्यार्थी (96.46 टक्के) उत्तीर्ण झाले. पुणे विभागात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक आहे. 95.93 टक्के मुले, तर 97.17 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. दहावीच्या परीक्षेसाठी परदेशातून 27 हजार 761 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 27 हजार 652 विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 267 विद्यार्थी (98.61 टक्के) उत्तीर्ण झाले. राज्याचा निकाल 96.53 टक्के लागला असून, त्यात 96.02 टक्के मुले, तर 97.21 टक्के मुली आहेत.
हेही वाचा

रत्नागिरी : ‘कासव संवर्धन’ला तापमानवाढीचा फटका
यंदाच्या पावसाळ्यात कोकण किनारपट्टीवर 22 ‘हायटाईड’
राज्यात चौथ्या टप्प्यात 59 टक्के मतदान