नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 65 पार

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 65 पार

नंदुरबार – नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत 37.33% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतरही भर उन्हात उत्साह दिसून आला. दुपारी चार वाजेपर्यंत त्याच वेगाने 50% इतके मतदान पार पडले. पाच पर्यंतच्या माहितीनुसार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 60.60% मतदान झाले असून शेवटच्या टप्प्यात एकूण मतदान 65 टक्के च्या पुढची पातळी गाठेल असे दिसत आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघात तर 69 टक्केहून अधिक मतदान झालेले दिसले.
उन्हाची तीव्रता असल्यामुळे बहुसंख्य मतदार बाहेर पडलेले नाहीत. सलग सुट्या असल्यामुळे बाहेर गावी गेलेल्या मतदारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय वैयक्तिक प्रश्नांवरून राजकीय भूमिका बनवणाऱ्या मतदारांमधील उदासीनता दिसून येते या एकंदरीत परिणामामुळे एकूण मतदान 60 टक्के च्या पुढची पातळी गाठणार नाही असे म्हटले जात होते. तथापि अनेक गावांमध्ये 70 ते 80 टक्के मतदान झालेले दिसून आले. सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शहादा विधानसभा मतदारसंघात 63% हून अधिक तर नवापूर तालुक्यात 69 टक्के च्या पुढे मतदान झाले आहे. एकंदरीत 65% च्या पुढे मतदान होत असेल तर बुथवरची लढाई रंगतदार बनत असल्याचे ते संकेत आहेत, असे अनुभवी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विशिष्ट भागातील विशिष्ट मतदान केंद्रांवरून सकाळपासूनच जोरदार रांगा लागलेल्या दिसल्या. विशिष्ट विचारधारा जपणारा मतदार कृतिशील दिसून आला आणि त्यातूनच देशाचे नेतृत्व निश्चित करणारी ही निवडणूक असल्याचे जाणवून देणारे वातावरण पाहायला मिळाले. काही मतदारांशी संवाद साधला असता मतदार संघात झालेला विकास आणि लाभाच्या योजना यावर शहरी मतदार बोलला नाही परंतु लोकशाही वाचवणे महत्त्वाचे असल्याने मतदानाला आलो असे काही जणांनी सांगितले तर काही जणांनी राष्ट्र हित जाणणाऱ्या नेत्यांच्या हातीच सत्ता देण्यासाठी मतदान करत असल्याचे काही जणांनी सांगितले.
दरम्यान, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना विजयकुमार गावित निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे नवखे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेत बोलू शकणारे तसेच सामान्य जनतेचा आणि गावाचा विकास करणारे नेतृत्व महत्त्वाचे की आरक्षण व संविधान रक्षण यावर आधारित परिवर्तनाचा नारा देणारे नेतृत्व महत्त्वाचे, या मुद्द्यावरील प्रचार लढाई मागील काही दिवसापासून रंगली होती. त्याचे पडसाद बुथवरच्या लढाईत मतपेटीतून उमटत असल्याचे दिसते. त्यामुळेच दुर्गम धडगाव पासून शिरपूर साक्री पर्यंत उत्साहात मतदान होताना दिसत आहे.
विधानसभानिहाय (4 वाजेपर्यंत झालेले मतदान)
दरम्यान, 4 वाजेपर्यंत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात 47.20% म्हणजे 1 लाख 44 हजार 388 मतदारांनी, शहादा विधानसभा मतदारसंघात 51.72% म्हणजे 1 लाख 76 हजार 303 मतदारांनी, नंदुरबार विधानसभा मतदारसंघात 47.27% म्हणजे 1 लाख 61 हजार 984 मतदारांनी, नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 60.26% म्हणजे 1लाख 74हजार 788 मतदारांनी, साक्री विधानसभा मतदारसंघात 49.4% म्हणजे 1लाख 75 हजार 062 मतदारांनी, शिरपूर विधानसभा मतदारसंघात 45.22% म्हणजे 1 लाख 50 हजार 939 मतदारांनी हक्क बजावला.
हेही वाचा –

परभणी: अपघातात जखमी झालेले प्रा. नितीन उंडाळकर यांचे निधन
‘इंडिया’ आघाडी जिंकल्‍यास, मी ५ जूनला तुरुंगाबाहेर असेन : केजरीवाल
काय म्हणता, हजार रुपयातही निवडणूक लढवता येऊ शकते!